गवाणे येथील घटना, लांजा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल
लांजा (प्रतिनिधी):काजू फॅक्टरीतून सुमारे ३ लाख १२ हजार रुपये किंमतीचा काजूगर चोरून नेल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील गवाणे येथे घडली आहे. विशेष म्हणजे फॅक्टरी चालवणाऱ्या व्यक्तीने आपल्याच भागीदारावर आणि त्याच्या मित्रावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत शिरीष पंडित (वय ३०, रा.साडवली, देवरुख, ता.संगमेश्वर) हे गवाणे येथील ‘रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित’ ही काजू फॅक्टरी चालवतात. रविवारी १५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अनिकेत पंडीत यांचे भागीदार लोकेश शेनॉय (रा.आनंद नगर, पुणे) आणि त्यांचा मित्र अर्जुन बोरकर यांनी संगनमत करून फॅक्टरीमध्ये प्रवेश केला.यावेळी त्यांनी फॅक्टरीतून ८०० रुपये किलो दराचा, प्रत्येकी १० प्लास्टिक पॅकेटमध्ये भरलेला एकूण ३९० किलोचा पक्का काजूगर अनिकेत यांच्या संमतीशिवाय इर्टिगा कार मध्ये (क्रमांक एम.एच.१२.एलडी. ५१२१) भरून लंपास केला.
या चोरीच्या प्रकारानंतर अनिकेत पंडित यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीवरून लांजा पोलीसांनी लोकेश शेनॉय आणि अर्जुन बोरकर यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०५ व ३(५) नुसार गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विलास जाधव हे करीत आहेत.












