पेंडूर येथील ऐतिहासिक जैन शिल्पकलेच्या जतन व संवर्धनाच्या हालचालींना वेग

माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी : उपसरपंच सुमित सावंत यांनी वेधले होते मंत्री आशिष शेलार यांचे लक्ष : अवघ्या काही तासातच कार्यवाही सुरु

 

मालवण | प्रतिनिधी : मालवण

तालुक्यातील खरारे पेंडूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शेकडो वर्षांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या जैन शिल्पकृतींचे उत्खनन, संवर्धन आणि तिथेच भव्य ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

उपसरपंच सुमित सावंत यांच्या माध्यमातून या महत्त्वाच्या विषयावर माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना सविस्तर निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत मंत्री महोदयांनी तातडीने सूचना देत, संबंधित विभागाला प्रत्यक्ष जागेची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

 

यावेळी सहायक संचालक विलास वहाने, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण,

उपसरपंच सुमित सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सतीश वाईरकर, विजय निकम, हेमंत दळवी, संदेश नाईक, अमित कुलकर्णी, तलाठी आणेराव, बंडू गावडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

 

मंत्र्यांचे आदेश, यंत्रणा कार्यान्वित

 

मंत्री आशिष शेलार यांच्या आदेशानुसार अवघ्या काही तासांतच पुरातत्व व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पेंडूर येथील देवी सातेरी मंदिरामागील ऐतिहासिक जागेला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी जैन शिल्पकृतींच्या अवशेषांची पाहणी केली. या परिसरात अद्यापही अनेक दुर्मिळ शिल्पे जमिनीखाली गाडली गेली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू

 

विभागीय अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केल्यानंतर, या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी आणि तिथे संग्रहालय उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू केली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता मार्गी लागणार असल्याचे चित्र आहे.

 

पर्यटनात मैलाचा दगड ठरणार

 

“पेंडूर गावातील हा ऐतिहासिक ठेवा जिल्ह्याच्या पर्यटनात मैलाचा दगड ठरणार आहे. या शिल्पकृतींचे संवर्धन होऊन तिथे संग्रहालय झाल्यास पुढील पिढीला आपला देदीप्यमान वारसा जवळून पाहता येईल. या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, ऐतिहासिक वारसा जपण्याच्या या मोहिमेला आता खऱ्या अर्थाने बळ मिळाले आहे.