IMD चा अंदाज: तापमान 40-41 अंशांवर
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा फटका
महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. अनेक भागांमध्ये तापमान आधीच 40 अंशांच्या पुढे गेले असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना विशेष इशारा देण्यात आला आहे. कोकणात उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
पुणे : भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवसांत राज्यातील कमाल तापमानात २-३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शुक्रवारपर्यंत अनेक भागांमध्ये तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
विदर्भात १५ ते १८ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १६ आणि १७ एप्रिल रोजी उष्णतेचा प्रभाव जाणवू शकतो. अकोला (४३°C), अमरावती (४२°C), मालेगाव (४१°C) आणि परभणी (४१°C) येथे आधीच उच्च तापमान नोंदवले गेले आहे.
हवामान तज्ञांच्या मते, चक्रीवादळविरोधी प्रणालीमुळे तापमानात वाढ होत आहे आणि पुढील तीन ते पाच दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर १-२ अंशांनी तापमानात घट होऊ शकते.
पुणे आणि घाट परिसरात पुढील काही दिवस कोरडे हवामान राहील, तर सांगली आणि सोलापूरमध्ये १५-१६ एप्रिलला उष्णतेची लाट येऊ शकते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये १४ ते १६ एप्रिलदरम्यान उष्ण आणि दमट वातावरण राहणार आहे. आर्द्रतेमुळे अस्वस्थता वाढण्याची शक्यता असून नागरिकांना त्रास जाणवू शकतो.
प्रशासनाने नागरिकांना उन्हात दीर्घकाळ राहणे टाळण्याचा, पुरेसे पाणी पिण्याचा आणि दुपारच्या वेळेत विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.










