माझी वसुंधरा अभियान ५.० अभियानात राजापूर नगर परिषदेची बाजी

जिल्हयात प्रथम तर कोकण विभागात द्वितीय व राज्यात तेरावा क्रमांक पटकावला
हे समस्त राजापूरकरांचे यश –नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे

राजापूर | प्रतिनिधी : स्वच्छ राजापूर व सुंदर राजापुरचा नारा देत राजापूर नगर परिषदेच्या वतीने शहरात राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान ५.०’ या अभियानात राजापूर नगर परिषदेने बाजी मारली आहे. या अभियानात राजापूर नगर परिषदेने रत्नागिरी जिल्हयात प्रथम क्रमांक पटकावताना कोकण विभागात द्वितीय आणि राज्यात १३ वा क्रमांक पटकावला आहे. तशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
राजापूर नगरपरिषदेच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी या अभियानात प्रशासनाने केलेली कामगिरी, नागरिकांचा सहभाग व सहकार्य याबद्दल सर्वांना धन्यवाद देत अभिनंदन केले आहे. हे यश केवळ नगरपरिषदेचे नसून राजापूरच्या प्रत्येक नागरिकाचे आहे. पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेल्या उपक्रमांना नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच आपण ही यशस्वी झेप घेऊ शकलो असेही त्यांनी सांगितले. शहरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, पाणी संवर्धन आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या उपक्रमांना अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी आणि नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. भविष्यातही पर्यावरण रक्षणासाठी अधिक प्रभावी उपक्रम राबवून राजापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करू असे आवाहनही एड. खलिफे यांनी केले.
राजापूर नगर परिषदेने माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी, वायू, जल, अग्नी,आकाश या पंच तत्त्वावर आधारित पर्यावरण संबंधित विविध कामे राबवण्यात येत आहेत. यात प्रशासनाकडून मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांसह सर्व अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करत आहेत. तर नागरिकांचीही मोलाची साथ मिळत आहे. या यशामुळे राजापूर नगरपरिषदेचा नावलौकिक वाढला असून, पुढील काळातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्याचा निर्धार लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड, हुस्नबानू खलिफे, उपनगराध्यक्ष विनय गुरव, आरोग्य सभापती श्री.सुलतान ठाकूर यांसह सर्व नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.