सिंधुदुर्गात पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान उत्कृष्ट राबविल्या बद्दल भाजप प्रदेश कडून कौतुक…

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कडे जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई यांज कडुन अहवाल सुपूर्त..

वेंगुर्ले : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीरीत्या पार पडलेल्या निवासी मंडल प्रशिक्षण वर्गांचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची मुंबई – दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात भेट घेऊन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियान जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला . यावेळी अभियानाचे जिल्हा सहसंयोजक जिल्हा उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य प्रमोद रावराणे, सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक श्रीकृष्ण उर्फ राजु परब, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, अभियान सह संयोजक रविंद्र मडगांवकर उपस्थित होते.

जिल्ह्यातील १४ संघटन मंडलांमध्ये आयोजित निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. या प्रशिक्षण उपक्रमांमुळे कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक स्पष्टता, संघटनात्मक बांधिलकी आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

या अभियानाअंतर्गत ओरोस येथील वसंत स्मृती येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेनंतर मंडल स्तरावरील प्रशिक्षण वर्गांना वेग आला होता. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या नियोजनातून संपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.

प्रशिक्षणामध्ये वैचारिक अधिष्ठान, पक्षाचा इतिहास व विकास, कार्यविस्ताराची दृष्टी, कार्यपद्धती, सरकारची कामगिरी व अंमलबजावणी, बूथ व्यवस्थापन तसेच सोशल मीडिया या महत्त्वपूर्ण विषयांवर सात सत्रांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी जिल्ह्यातील ३० प्रशिक्षित वक्त्यांनी प्रभावी सत्रे घेतली.

या प्रशिक्षण अभियानामुळे “व्यक्ती निर्माणातून संघटन निर्माण आणि संघटन निर्माणातून राष्ट्र निर्माण” या विचारांची प्रभावी रुजवण कार्यकर्त्यांमध्ये झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. पक्ष संघटन अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरल्याचेही सांगण्यात आले.

कार्यक्रमानंतर तयार करण्यात आलेला सविस्तर अहवाल प्रदेश पातळीवर सादर करण्यात आला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रशिक्षण अभियान यशस्वीरीत्या राबविल्याची नोंद प्रदेश स्तरावर घेण्यात आली आहे.

या संपूर्ण उपक्रमात मंडल अध्यक्ष, संयोजन समिती सदस्य, वक्ते व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग लाभला. तसेच अभियानाचे महाराष्ट्र सहसंयोजक आमदार निरंजन डावखरे व प्रा. वर्षा भोसले यांचीही भेट घेऊन त्यांनाही अहवाल सादर करण्यात आला.