सावंतवाडीत वादळी वाऱ्याचा हाहाकार; २१ ठिकाणी मोठे नुकसान

आमदार दीपक केसरकरांसह नगराध्यक्षांकडून पाहणी

विशेष बाब म्हणून मदत मिळवून देण्याचे आश्वासन

सावंतवाडी | प्रतिनिधी : शहरात रात्री झालेल्या भीषण वादळी वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले असून, यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची सविस्तर पाहणी केली. शहरात तब्बल २१ ठिकाणी झाडे कोसळणे व घरांची पडझड होण्याचे प्रकार घडल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

आमदार केसरकर यांनी सबनीसवाडा, मोती तलाव परिसर, रामेश्वर प्लाझा आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय या भागांची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “कालचा प्रकार हा केवळ पाऊस नसून ते चक्रीवादळ होते. त्यामुळे पावसाच्या सामान्य नियमांतर्गत भरपाई न देता, चक्रीवादळाच्या प्रमाणकाखाली पंचनामे करून विशेष बाब म्हणून मदत देण्याच्या सूचना मी तहसीलदारांना दिल्या आहेत. याबाबत लवकरच बैठक घेऊन ही मदत तातडीने मिळवून दिली जाईल.”

*शेतकऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार*

तळकोकणातील शेतकऱ्यांच्या अवकाळी नुकसानीबाबत आमदार केसरकर यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “येत्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मी कोकणातील शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधणार आहे. पावसाचा वाढता जोर पाहता शेतकऱ्यांना अधिकच्या मदतीची गरज असून, ती मिळवून देण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील.” तसेच महावितरणचा खंडित पुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

 

*नगरपालिका प्रशासन सज्ज – नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले*

नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनीही पथकासह नुकसानीची पाहणी केली. “शहरातील नागरिकांना मदत करण्यासाठी पालिकेची टीम तैनात आहे. नगरसेवकांच्या माध्यमातून प्रत्येक नुकसानीची माहिती घेतली जात आहे. महावितरणसोबत बैठक घेऊन पावसाळ्यापूर्वी धोकादायक फांद्या हटवण्याबाबत कडक सूचना दिल्या जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री नितेश राणे आणि राज्य सरकारकडून सावंतवाडीला निश्चितच भरीव मदत मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या पाहणी दौऱ्यावेळी आमदार दीपक केसरकर आणि नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्यासोबत मुख्याधिकारी विनायक औंधकर, युवराज लखमराजे भोंसले, नगरसेवक अजय गोंदावळे, सुकन्या टोपले, प्रतिक बांदेकर, न.प.चे वैभवकुमार अंधारे, दीपक म्हापसेकर, जयप्रकाश सावंत, हेमंत बांदेकर, अर्चित पोकळे यांसह अन्य पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.