देवगड / प्रतिनिधी
सध्या आंबा व काजू बागायतदारांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईसाठी अर्ज प्रक्रियेतील जाचक अटी शिथिल कराव्यात. तसेच अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग आंबा, काजू बागायतदार व व्यापारी महासंघाच्यावतीने देवगड तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे, सध्या आंबा व काजू बागायतदारांवर आलेल्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर नुकसानभरपाईसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत असून या प्रक्रियेत ठेवण्यात आलेल्या काही अटी व तांत्रिक अडचणींमुळे अनेक बागायतदारांना अर्ज करता येत नाही. विशेषतः ई- पीक पाहणी, फार्मर आयडी, तसेच इतर कागदपत्रांच्या अटींमुळे मोठ्या प्रमाणावर बागायतदार वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसानभरपाई अर्जासाठी ठेवलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात. अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. ज्या बागायतदारांची ई- पीक पाहणी नोंद झालेली नाही. त्यांच्यासाठी तलाठीमार्फत हस्ते नोंद (मॅन्युअल एन्ट्री) करून देण्यात यावी. सर्व बागायतदारांचे फार्मर आयडी अद्याप तयार नसल्यामुळे ही अट तात्पुरती शिथिल करून अर्ज स्वीकारावेत. या बाबींचा विचार करून सर्व पात्र बागायतदारांना नुकसानभरपाईचा लाभ मिळेल, यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. यावेळी महासंघाचे अध्यक्ष आनंद ढोके, प्रसाद मोंडकर, आप्पा अनभवणे, गणेश वाळके, प्रशांत शिंदे, नीलेश पेडणेकर, विकास दीक्षित आदी उपस्थित होते.











