आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या घटनांचा शोध घेऊन त्या रोखण्याचा पोलीस दल प्रयत्न करेल! जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल

सिंधुनगरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील आत्महत्या रोखण्यासाठी आपण प्रयत्नशील असून काही घटनांचा आपण आढावा घेत आहोत. एका बाजूने आत्महत्येमुळे त्या कुटुंबाची बदनामी होऊ नये या दृष्टीने पोलीस काळजी घेत आहेत. एखादी व्यक्ती नैराश्येतून आत्महत्या करण्याच्या घटना असल्या तरी नेमके आत्महत्येचे कारण काय? व ते उघड होण्यासाठी आपण प्रत्येक घटनांची सखोल चौकशी करणार आहोत. यात कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ नये मात्र जर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार घडत असेल तर ही प्रवृत्ती थांबण्यासाठी पोलीस निश्चितच कारवाईचे पाऊल उचलतील असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आत्महत्येच्या अनेक घटना घडत असून त्या रोखण्याबाबत पोलीस दल निश्चितच प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया मुख्यालय पत्रकारांशी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील काही घटनाची आपण स्वतः चौकशी करणार आहोत. काही युवतीनी केलेली आत्महत्या व त्यामागचे कारण शोधले गेले तर आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रवृत्ती ही थांबविता येतील. म्हणूनच जिल्ह्यात झालेल्या आत्महत्यांच्या घटनांचा अभ्यास पोलीस करतील व त्या दृष्टीने कारवाई करतील असा विश्वास आहे त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात काही घर फोडीच्या तसेच मंदिरातील दान पेट्या फोडण्याच्या घटना घडत असून या छोट्याला लगाम घालण्यासाठी ही पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. जिल्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज तसेच चोरीच्या ठिकाणी मिळालेल्या फिंगरप्रिंट्स यावरही पोलीस दलाची सायबर शाखा काम करीत आहे. दोन दिवसापूर्वी सिंधुनगरी परिसरातील दानपेट्या फोडण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनांबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या ठिकाणी काही फिंगर प्रिंट सापडले असून मागील काळातील आरोपींच्या ठशाची पडताळणी केली जात आहे. असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अग्रवाल यांनी सांगितले.
आंबोली जंगलात झालेला दहशतवाद्यांनी केलेला स्फोट याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले असता याबाबतचा तपास वरिष्ठ पातळीवरून व अन्य यंत्रणांकडून होत असल्याची चर्चा आहे. मात्र त्याबाबत आपणास अधिकृत कोणत्याही यंत्रणांकडून संपर्क साधला गेला नाही. जिल्हा पोलीस दलाने याबाबत या जिल्ह्यात अशा कारवाया होऊ नयेत म्हणून दक्षता घेतली आहे. तशा सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. व आंबोली येथे घडलेल्या त्या घटनेबाबत चौकशी सुरू आहे असेही शेवटी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितले.