खोटी आश्वासने आणि ठेकेदारांना पाठीशी घालणे हेच वैभव नाईक यांचे काम !

मालवण शहर भाजप प्रभारी विजय केनवडेकर व तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासारखे सामाजिक दातृत्व व विकासकामे करण्याची धमक ठाकरे गटाच्या आमदार, खासदार यांच्यात आहे का ?

मालवण | प्रतिनिधी : दोन टर्म आमदार असतानाही मतदारसंघाला विकासकामांत मागे नेण्याचे काम वैभव नाईक यांच्या अपयशी कारभारामुळे झाले. मागील दोन वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तर राज्या बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास ठप्प झाला. जनतेला खोटी आश्वासने व ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम ठाकरे गट व आमदार नाईक यांनी केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता यांना घरी बसवणार हेच चित्र सगळीकडे दिसून येत आहे. त्यामुळे हतबल झालेल्या मालवण तालुका ठाकरे गटाची टिवटीव सुरू आहे. अशी टीका भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी केली आहे.

आमदार नाईक आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न आठ दिवसात तीन वेळा केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली नाही. त्यामुळे आमदार नाईक अधीकच अस्वस्थ बनले आहेत. त्यांना पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. असा हल्लाबोल तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केला आहे.

माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे आमच्या नेत्यांवर टीका टिपण्णी करतात. असे सांगत ठाकरे गट मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी भाजप नेत्यांवर टीका करण्याचा प्रयत्न केला होता. या टीकेचा समाचार मालवण तालुका भाजपच्या वतीने आक्रमक शैलीत घेण्यात आला. शहर प्रभारी विजय केनवडेकर व तालुकाप्रमुख धोंडी चिंदरकर यांनी ठाकरे गट व आमदार वैभव नाईक यांच्या कारभाराचा मालवण भाजप कार्यालय येथे पत्रकार परिषद माध्यमातून पंचनामा केला.

यावेळी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, माजी नगरसेवक गणेश कुशे, आप्पा लुडबे, प्रमोद करलकर, मोहन वराडकर, विलास मुणगेकर, नंदू देसाई, बाबू कासवकर, बाबू कदम, दादा कोचरेकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राकेश सावंत, निशय पालेकर, गौरव लुडबे, निनाद बादेकर, राज कांदळकर, चंद्रकांत मयेकर, राजा मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

केनवडेकर, चिंदरकर म्हणाले, हरी खोबरेकर यांनी मालवण शहर व तालुक्यात रखडलेली विकासकामे पहावीत. खड्डेमय रस्ते पाहावेत. आमदार नाईक यांनी जनतेला दिलेल्या खोट्या आश्वासनांचा विचार करावा. कुडाळ मालवण भाजप प्रभारी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करता त्यांचे दातृत्व व विकास कामांची धमक व उंची पहा. निलेश राणे यांनी सहा महिन्यात गरीब गरजू रुग्णांना ३२ लाखाची मदत केली, त्यांचे सेवाकार्य अखंडित चालू असते. त्याचा विचार करा. ठाकरे गटातील कोणाला हे जमेल का ? केवळ खोट्या बाता नेत्यांना खुश करण्यासाठी सुरू असलेली बडबड थांबवा. असेही केनवडेकर म्हणाले.

निलेश राणे यांनी वर्षभरात सुमारे १२ कोटी निधी शासन माध्यमातून मालवण शहरासाठी आणला. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निलेश राणे यांनी कोट्यावधी निधी तालुक्यात आणला. आमदार नितेश राणे यांनीही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युती शासन माध्यमातून कोट्यावधी निधी मतदारसंघात आणण्याचा सपाटा लावला आहे. विकास हेच भाजपचे व्हिजन आहे.

त्यामुळे विकासकामे अथवा जनतेला अपेक्षित कार्य यात कोणत्याही प्रकारे स्पर्धा, शक्ती प्रदर्शन करायला आम्ही तयार आहोत. मात्र भाजपच्या गतिमान विकासाची स्पर्धा करणे शक्य नसल्याने टीकाटिप्पणी करण्याचे काम ठाकरे गटाचे नेते म्हणवणारी मंडळी करत आहेत.

यांचे आमदार ठेकेदारांना पाठीशी घालतात. मालवण शहर भुयारी गटार योजना ठेकेदाराने जनतेची फसवणूक केली. आता तर दोन वर्षे काम नसताना ठेकेदाराला पैसे देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेतला. ज्या मशीन आल्या नाहीत त्यासाठी ठेकेदाराला दीड कोटी दिले. ते कोणी दिले? ठेकेदाराला नगरपालिका कडून जावई असल्यासारखी वागणूक देण्यात आली. मात्र या कामाची चौकशी व्हावी यासाठी माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आमचा शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. तक्रारही करण्याची कार्यवाही सुरू आहे. ठाकरे गटाने यावर बोलावे. असेही आव्हान विजय केनवडेकर यांनी दिले.

वाळू उपसा होड्या मागे २५ हजार मागणी ठाकरे गट पदाधिकारी करत असल्याचा गंभीर आरोप धोंडी चिंदरकर यांनी यावेळी केला. याबाबत पुरावे असल्याचेही चिंदरकर यांनी सांगितले आहे. तसेच खाडी पात्रात सुरू असलेले वाळू उत्खनन थांबले पाहिजे. असेही आवाहन धोंडी चिंदरकर यांनी या निमित्ताने उत्खनन करणाऱ्यांना केले. प्रशासन योग्य ती कारवाई करेल. गणेश चतुर्थी उत्सव नंतर नियमानुसार वाळू व्यवसाय सुरू होण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे चिंदरकर यांनी सांगितले.