आपत्कालीन परिस्थितीत तहसिलदारांच्या “ऑनफिल्ड” कार्यतत्परतेची मनसेकडून दखल

मनसे पदाधिकाऱ्यांनी केला सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांचा सन्मान

सावंतवाडी । प्रतिनिधी : पंधरा दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुक्यात उद्भवलेल्या पुरसदृश्य परिस्थितीत तसेच इतर आपत्कालीन कालावधीत रात्री बेरात्री स्वतः कर्मचाऱ्यांसोबत ऑनफिल्ड उपस्थिती दाखवत मदतकार्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या कार्यतत्परतेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दखल घेऊन मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात जात त्यांचा सत्कार केला. सावंतवाडी तालुक्यासाठी पंचक्रोशी निहाय तरुणांची निवड करून आपत्कालीन यंत्रणा उभी करावी, अशी मागणी यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली.
जुलै महिन्यात सावंतवाडी तालुक्यात पावसाने कहर करत संपूर्ण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले होते. त्यामुळे सावंतवाडी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण होऊन अनेक ठिकाणी घरांची शेतमांगर तसेच झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. वीज वाहिन्या तुटल्यामुळे काही ठिकाणी गुरे दगावली होती. एकूणच आपत्कालीन परिस्थिती मोठ्या प्रमाणात उद्भवली असताना प्रशासनाकडून आपत्ती प्रतिबंधात्मक उपाय योजना युद्ध पातळीवर करण्यात आल्या. यात तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करूनयंत्रणेला सूचना देत व जातीने त्या ठिकाणी उपस्थित राहून आपली कार्यतत्परता दाखवून दिली.

याशिवाय आंबोली घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटनांमध्ये तहसीलदार स्वतः स्पॉटवर पोहचून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आढावा घेत होते. सावंतवाडी मोती तलावात देखील स्वतः उतरलेले दिसून आले होते. अशा प्रसंगात कार्यालयाच्या चार भिंतीत बसून आदेश न देता व तालुक्याचे प्रशासन प्रमुख म्हणून सर्व ठिकाणी ऑन फिल्ड जागता पहारा देत संपूर्ण तालुक्यात फिरून आढावा घेत होते.त्यामुळे नैसर्गिक आपत्ती व पुरसदृश्य परिस्थिती सावंतवाडी तहसीलदार व सर्व प्रशासकीय यंत्रणेने नागरिकांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने हाताळल्याची दखल घेऊन
मनसे पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी तहसील कार्यालयात तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी मनसेचे माजी शहर अध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार आरोस माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक नंदू परब सुरेंद्र कोठावळे म.न.वि.से शहराध्यक्ष निलेश देसाई पिंट्या नाईक ज्ञानेश्वर नाईक संदेश सावंत स्वप्निल जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून त्यांच्या कामाचे कौतुक केले.