वाफोलीत कालव्याचे निकृष्ट बांधकाम कोसळले

कालवा शेतकर्‍यांसाठी, अधिकार्‍यांसाठी की ठेकेदारांसाठी ?

वाफोली सरपंच, उपसरपंचांचा खोचक सवाल

बांदा : प्रविण परब :   तिलारी कालव्याच्या बांदा शाखा कालवा अंतर्गत वाफोली गावातील दीड महिन्यांपूर्वी दुरुस्ती केलेल्या कालव्याचे बांधकाम कोसळले. लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेल्याने जलसंपदा विभाग तोंडघशी पडला आहे. संबंधित ठेकेदाराने याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला अंधारात ठेवले होते. कालवा विभागाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरुन केलेल्या निकृष्ट कामांबाबत स्थानिक ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. कालवा शेतकर्‍यांसाठी, अधिकार्‍यांसाठी की ठेकेदारांसाठी ? असा खोचक सवाल वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस यांनी उपस्थित केला.
तिलारी कालवा व निकृष्ट काम हे एक समीकरणच बनले आहे. तिलारी कालवा शेतकर्‍यांसाठी की ठेकेदार व अधिकार्‍यांसाठी असा प्रश्न गेली दहा वर्षे सातत्याने उपस्थित केला जात आहे. शेती व बागायतीला तिलारीचे पाणी मिळेल या भाबड्या आशेने स्थानिक शेतकर्‍यांनी लाख मोलाच्या जमिनी अत्यंत कवडीमोलाने या प्रकल्पासाठी दिल्या. मात्र, तीन तपाचा कालावधी उलटला तरीही शेतकरी मात्र अद्यापही पाण्याच्या प्रतिक्षेत आहे.

    तिलारी कालवा हा प्रकल्प तिलारी विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यासाठी सोन्याची कोंबडी देणारा ठरला आहे. कालवा दुरुस्तीसाठी दरवर्षी करोडो रुपयांचा निधी खर्च केला जातो. दुरुस्तीची कामे इतकी निकृष्ट दर्जाची केली जातात की दर तीन चार वर्षांनी पुन्हापुन्हा त्याच ठिकाणी दुरुस्तीचे कारण दाखवून निधी खर्च केला जातो.
वाफोली हरिजनवाडी नजीक कालव्याची दुरुस्ती जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत करण्यात आली होती. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला मात्र याबाबत अंधारात ठेवण्यात आले. त्या कामाच्या दर्जाबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र, अधिकार्‍यांच्या आशिर्वादाने संबंधित ठेकेदाराने घाईगडबडीत हे काम उरकले होते. त्यामुळे केवळ दीड महिन्यातच ही भिंत कोसळली व कामाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.
संबंधित ठेकेदाराने कालव्यातील माती जबरदस्तीने स्थानिकांच्या जमिनीत बागायतीत टाकली होती. त्यामुळे पारंपरिक पायवाटाही नष्ट झाल्या. याबाबत शेतकरी महेश गवस यांनी जलसंपदा विभागाचे वारंवार लक्ष वेधले. मात्र, त्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली नसल्याचा आरोप गवस यांनी केला.
वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस यांनीही वेळोवेळी कालवा कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांनी ठेकेदाराला पाठबळ दिल्याचा आरोप विनेश गवस यांनी केला. ठेकेदार व अधिकारी यांची दुरुस्ती कामात मिलीभगत असल्याने दुर्लक्ष करण्यात आल्याचे सरपंच शिरोडकर यांनी स्पष्ट केले.