शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार मार्गदर्शन
चिपळूण | वार्ताहर : कृषी विद्यापीठ व कृषी महाविद्यालयाच्या विविध संशोधनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषिदूत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहेत. कृषिदूतांचे आंबडस येथे स्वागत करण्यात आले. खरवते – दहिवली (ता. चिपळूण) येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव अभियानाचा प्रारंभ गावात केला.
आंबडस गावचे सरपंच, तलाठी , ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. बीजप्रक्रिया, पिकांवरील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, बोर्डो मिश्रणाचा वापर यांची प्रात्यक्षिके हे कृषिदूत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेणार आहेत, असे कृषिदूतांनी सांगितले. सरपंच निलेश मोरे , ग्रामविकास अधिकारी रवींद्र पत्याणे , तलाठी र . म.सहस्रबुद्धे, गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती आदी कार्यक्रमास उपस्थित होते. कृषिदूत शुभम जाधव , ऋषिकेश जगताप , धीरज खाडे, प्रितेश नाकील , आकाश राऊत , समीर गुरव यांनी थोडक्यात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील , विभाग प्रमुख प्रा . एच.एस.भागडे , ग्रामीण कृषि कार्यानुभव अधिकारी प्रा. पी. बी. पाटील , प्रा. एन. सी. पाकळे मार्गदर्शन लाभत आहे.












