बांदा भाजपतर्फे ९ सप्टेंबरला लाखाची दहीहंडी

सहभागी पथकांवर बक्षीसांची खैरात

मराठी सीनेसृष्टीतील नामवंत सेलिब्रिटी उपस्थित राहणार

पत्रकार परिषदेत माहिती

बांदा (प्रतिनिधी) :
बांदा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी बांदा शहरात प्रथमच १ लाख १ हजार ११ रुपयांची दहीहंडी बांधण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मराठी सिने सृष्टीतील नामवंत अभिनेत्री व गायक सहभागी होणार असल्याची माहिती भाजपाचे युवा नेते प्रथमेश तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.या कार्यक्रमासाठी भाजपचे महाराष्ट्र व गोवा राज्यातील राज्यस्तरीय नेते देखील उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.  मुंबईतील नामांकित गोविंदा पथक देखील दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत.दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला १ लाख १ हजार ११ रुपये तर द्वितीय क्रमांकाच्या पथकाला ५० हजार ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या व सलामी देणाऱ्या प्रत्येक संघाला रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. ७ थर लावणाऱ्या पथकांना ७ हजार रुपये तर ५ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.मराठी सिने सृष्टीतील नामवंत कलाकार व गायक सहभागी होणार असून मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी हा राष्ट्रीय सण जाहीर केल्याने त्याच भव्यतेने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे प्रमोद कामत यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदर संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात येणार आहे.यावेळी प्रथमेश तेली यांच्यासह माजी सभापती प्रमोद कामत, शीतल राऊळ, उपसरपंच जावेद खतीब, स्पंदन फाऊंडेशनचे अध्यक्ष सिद्धेश महाजन, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, ग्रा. पं. सदस्य बाळू सावंत, गुरुनाथ सावंत, वाफोली उपसरपंच विनेश गवस, मधुकर देसाई, अशोक सावंत, कैलास गवस, केदार कणबर्गी, शैलेश केसरकर, सुधीर शिरसाट, आत्माराम गावडे, उमेश पेडणेकर आदी उपस्थित होते.