बांदा । प्रतिनिधी : अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच खेळ ही पण आजची मूलभूत गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासाकरिता खेळामध्ये सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. अभ्यासाइतकेच जीवनात व्यायाम व खेळ महत्त्वाचे आहेत. सुदृढ शरीर हेच यशाचे गमक आहे, असे प्रतिपादन माजी सैनिक अंतोन फर्नांडिस यांनी केले.
गोगटे वाळके महाविद्यालयाचा जिमखाना विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद जन्मदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख वक्ते माजी सैनिक अंतोन फर्नांडिस यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संबोधित केले.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हॉकी खेळाडू म्हेणून ओळखले जाते. मेजर ध्यानचंद, सचिन तेंडुलकर, मिल्खा सिंग, पी. टी. उषा, नीरज चोप्रा या खेळाडूंकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
आवड आणि छंद यामध्ये फरक आहे. खेळाची केवळ आवड असून चालत नाही तर छंद जोपासला पाहिजे. जगातील सर्व चांगल्या गोष्टींचे अनुकरण करा आणि तुमच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करा असेही श्री. फर्नांडिस म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. वेल्हाळ होते. त्यांनी खेळ आणि खेळाचे जीवनातील महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतात खेळाची जेवढी जागृती होणे आवश्यक आहे तेवढी झाली नाही. भारतातील सर्व खेळ जागतिक पातळीवर पोहोचले पाहिजेत असे प्रतिपादन डॉ. वेल्हाळ यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जिमखाना विभाग प्रमुख शरद शिरोडकर यांनी केले. यावेळी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याचा आढावा कुमारी सीमा नाईक हिने घेतला. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी कुमार गणेश प्रकाश गवस उपस्थित होता.
उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. किशोर म्हेत्री यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमाकांत गावडे यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून खेमराज ज्युनिअर कॉलेज आणि गोगटे वाळके महाविद्यालय यांच्यामध्ये कबड्डी सामना झाला.
या चुरशीच्या सामन्यात खेमराज ज्युनिअर कॉलेजच्या संघाने गोगटे वाळके महाविद्यालयाच्या संघावर मात केली. यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.












