चिपळूणात सकल मराठा क्रांती मोर्चा तर्फे भव्य निषेध मोर्चा

निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी
मराठा समाजाची मागणी

चिपळूण (प्रतिनिधी): जालन्यात मराठा बांधवांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेचा सकल मराठा क्रांती मोर्चा चिपळूणने भव्य मोर्चाद्वारे निषेध व्यक्त करीत या गंभीर प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून या समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जालन्यात उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांवर चार दिवसांपूर्वी पोलिसांनी लाठीचार्ज केला, याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. लाठीचार्ज विरोधात चिपळूणमधील मराठा बांधवही सोमवारी एकवटले. नगरपरिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली. तत्पूर्वी महिलांनी जिजाऊ वंदन हे गीत सादर केले. एक मराठा- लाख मराठा अशा गगनभेदी घोषणा देत हा मोर्चा चिंचनाका मार्गे पावर हाऊस प्रांताधिकारी कार्यालय असा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाला शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, चिपळूण नाभिक समाज आदीनी पाठिंबा दिला. मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव-भगिनी, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ध्वनी क्षेपकावरून एक मराठा लाख मराठा… जालना येथील लाठीचार्ज घटनेचा निषेध असो… अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी मोर्चामध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान करून व हाताला काळ्या रंगाची पट्टी बांधून मराठा समाज बांधवांनी निषेध नोंदवला.

प्रांताधिकारी आकाश लिगडे यांना सरकारसाठी दिलेल्या निवेदनानुसार जालना येथील अंतरावली सराटी येथे मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासंदर्भात शांततेने उपोषण सुरू होते. या उपोषणादरम्यान अचानक पोलिसांनी या उपोषणकर्त्या मराठा समाज बांधवांवर अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात मराठा समाज बांधव -भगिनी गंभीर जखमी झाले आहेत. या भ्याड हल्ल्याचा मराठा समाजातर्फे निषेध व्यक्त करण्यात येत आहे. जालना येथील मराठा समाज बांधवांचे आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरू होते. मात्र, पोलीस प्रशासनाने संयम न ठेवता परिस्थिती हाताळली आणि या हल्ल्यात मराठा समाज बांधव बांधवांना शारीरिक इजा पोहोचली. तरी या गंभीर प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून या समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मोर्चामध्ये आमदार भास्करशेठ जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेशभाई कदम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, मराठा समाजाचे नेते प्रकाश देशमुख, सतीश कदम, सुधीर राजेभोसले, माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाहा, राजू देवळेकर, सतीश मोरे, फैसल कासकर, संतोष सावंतदेसाई, डॉ. राकेश चाळके, बळीराम शिंदे, किशोर रेडिज, चित्राताई चव्हाण, निर्मलाताई जाधव, ऐश्वर्या घोसाळकर, कपिल शिर्के यांच्यासह मराठा समाजातील बांधव व विविध पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

शिंदे गटाचे नेते उमेश सकपाळ यांनी अतिथी येथील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यालयात जाऊन सकाळी प्रकाश देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला. मोर्चामध्ये एक मराठा लाख मराठा, असे झेंडे घेऊन समाजबांधव सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व महिलांनी केले. निषेधाचा फलक हातात घेऊन महिला मोर्चाचे नेतृत्व करीत होत्या. मराठा समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाच्या मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.