सामायिक जमिनीतून वाद, गुन्हा दाखल

देवगड / प्रतिनिधी :सामाईक जमिनीची मोजणी करून घेत असताना तळेबाजार येथील सतीश गणपत मोंडकर (७४) यांना मारहाण करून त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी सचिन पुरुषोत्तम मोंडकर (४०, रा. तळेबाजार) या संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ मे २०२५ रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास पन्हेळी- चांदोशी येथे घडली होती. मात्र, या घटनेत जखमी झालेले फिर्यादी सतीश मोंडकर यांनी वैद्यकीय उपचार घेऊन १५ सप्टेंबर रोजी घटनेची फिर्याद पोलीस स्थानकात दाखल केली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश मोंडकर व संशयित सचिन मोंडकर यांच्यात सामाईक जमिनीवरून वादविवाद आहेत. ८ मे रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास सतीश मोंडकर हे पन्हेळी – चांदोशी येथील त्यांच्या सामाईक जमिनीची मोजणी करून घेत असताना संशयिताने जमिनीच्या मोजणीस हरकत घेतली. यावेळी निर्माण झालेल्या वादात संशयिताने सतीश मोंडकर यांच्या अंगावर धावत येऊन त्यांना हाताच्या थापटाने मारहाण केली. तसेच त्यांना जाणीवपूर्वक दुखापत पोहोचविण्याच्या उद्देशाने तेथील खड्यामध्ये ढकलले. यात त्यांचा उजवा हात फॅक्चर होऊन त्यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान, या घटनेत झालेल्या गंभीर दुखापतीवर वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर सतीश मोंडकर हे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन सोमवारी देवगड पोलीस स्थानकात आले व त्यांनी घटनेची फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार संशयित सचिन मोंडकर याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११७ (२), ११५ (२), १३१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव करीत आहेत.