
सोहळा पाहण्यासाठी सावंतवाडीतील नागरिकांची अलोट गर्दी
सावंतवाडी । प्रतिनिधी : गो गो गो गोविंदा… गोविंदा रे गोपाळा… यशोदेच्या तान्ह्या बाळा, असा जयघोष करीत थरावर थर लावत सावंतवाडीतील गोविंदांनी दहीहंडी उत्सव साजरा केला. अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदापथकाच्या माध्यमातून मानाची दहिहंडी फोडत सावंतवाडी शहरातील उर्वरित हंड्या फोडण्यात आल्या. गोविंदांचा हा थरार याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी व दहीहंडीचा हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
उत्सवाच्या प्रारंभी संस्थानकालीन मुरलीधर मंदीरात धार्मिक कार्यक्रमासह आरती करण्यात आली. यानंतर मानाची दहिहंडी फोडत श्रीकृष्णाची मूर्ती बाजारपेठेतून विसर्जन स्थळी नेत असताना चौकाचौकातील दहिहंड्या फोडण्यात आल्या. यावेळी गोविंदांसह उपस्थित नागरिकांचाही उत्साह शिगेला पोहोचला होता.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमेय तेंडोलकर, परशुराम चलवाडी, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, निशांत तोरसकर, विनायक ठाकुर, ॲड. अतु्ल केसरकर, दिनेश जाधव, सनी जाधव, मयूर लाखे, अरूण घाडी, संदीप केसरकर, रोहित चव्हाण आदींसह अमेय तेंडोलकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते व सावंतवाडीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच शहरात कुठेही ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी वाहतूक पोलीसही जागोजागी तैनात करण्यात आले होते. दहीहंडीचे हे थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.












