सावंतवाडी ओरोस वर्दे एसटी बस गावठणवाडी पर्यंत  लक्ष्मण कदम यांची आगार प्रमुखांकडे मागणी 

सावंतवाडी । प्रतिनिधी : वर्दे गावात सध्या सावंतवाडी ओरोस वर्दे अशी बसफेरी ही रमाबाईनगर येथून मागे फिरवली जाते. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही गाडी पूर्वीप्रमाणे गावठणवाडी पर्यंत नेण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ लक्ष्मण उर्फ आज्या कदम यांनी आगार प्रमुखांकडे केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी आगार व्यवस्थापक निलेश गावित यांना सादर केले. यावेळी स्थानक प्रमुख विशाल शेवाळे उपस्थित होते.

सध्या गणेश चतुर्थी सणाची लगबग असून मुंबई पुण्याहून तसेच अन्य शहरातून ग्रामस्थांची गावामध्ये ये जा राहणार आहे. बसफेरी रमाईनगर येथून मागे फिरवली जात असल्याने कोकेमळावाडी व गावठणवाडी येथील प्रवाशांची गैरसोय होत आहे. सदरची बसफेरी गावठणवाडी पर्यंत पूर्ववत केल्यास येथील प्रवाशांची होणारी पायपीट थांबणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पडणारा आर्थिक भूर्दंड देखील वाचेल. तसेच शनिवार व रविवारी देखील बस फेरी सुरु ‘ठेवावी जेणेकरून सणासुदीच्या काळात प्रवाशांची सोय होईल तरी आपण याबाबत कार्यवाही करून प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी, असे आवाहनही त्यांनी निवेदनाद्वारे केले आहे.