मालवणात रिक्षा व्यावसायिकाची आत्महत्या

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील बसस्थानक लगतच्या बौद्धवाडी येथील रिक्षाचालक संजय कृष्णा कोळंबकर (वय- ४९) यांनी मध्यरात्री राहत्या घराच्या खोलीत दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय कोळंबकर हे बस स्थानक परिसरात रिक्षा व्यवसाय करत असत. गुरुवारी रात्री ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी घरातील सदस्यांनी त्यांचा दरवाजा ठोठावला असता कोणताही प्रतिसाद आला नाही. म्हणून त्यांचा भाऊ संतोष कोळंबकर यांनी पाहिले असता भाऊ संजय कोळंबकर यांनी दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, विलास टेंबुलकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत. संजय कोळंबकर यांच्या पश्चाता पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.