अध्यक्षपदी कल्पना तोरसकर
संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
मुंबई (प्रतिनिधी) : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दादर मुंबई येथील राजर्षी शाहू महाराज सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत संस्थेच्या कार्याध्यक्षपदी डॉ. मिलिंद तोरसकर, अध्यक्षपदी श्रीमती कल्पना प्रताप तोरसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या सभेत संस्थेच्या कार्यकारिणीवर संतोष लक्ष्मण सावंत, वैभव मोहन नाईक, रमेश परब, जितेंद्र गावडे, प्रवीण नाईक, रश्मी तोरसकर, जयेश तावडे, आदित्य सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
संस्थेचे कार्यक्षेत्र हे मुंबई, सावंतवाडी व दोडामार्ग तालुका असल्याने या सर्वसाधारण बैठकीला सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. यावेळी संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था राबवत असलेले विविध उपक्रम कुमार साहित्य संमेलन, जिल्हा क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन याबाबत माहिती देण्यात आली. संस्थेच्या सर्व शाळांमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षाचे निकाल चांगले लागल्याने सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या अभिनंदनाचा ठरावं घेण्यात आला.
६१ व्या नवा विद्यार्थी अंकाचे प्रकाशन स्व. आबासाहेब तोरसकर यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त करण्यात आले होते. त्या अंकाचे लोकार्पण या सभेत श्रीमती सीमा तोरसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजय नारायण सावंत व लक्ष्मण जगन्नाथ पावसकर यांचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत ठराव घेण्यात आला. तसेच या सभेत बिनविरोध निवडून आलेली कार्यकारिणी हीच नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाची अधिकृत कार्यकारिणी असल्याचा ठराव देखील घेण्यात आला.
संस्थेच्या कार्याचा पसारा हा खुप मोठा असून सर्वांनी एकत्रित येऊन एकजुटीने संस्थेच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहूया असे आवाहन यावेळी डॉ. मिलिंद तोरसकर यांनी बोलताना केले.
————












