दोघेजण गंभीर जखमी
रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी पावस रस्त्यावर वायंगणी फाटा येथे साळवी गार्डनकडे वळणाऱ्या दुचाकीला मागुन येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. अपघाताची हि घटना गुरुवार 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12.39 वा.सुमारास घडली असून यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करून अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
नारायण वासूदेव चिपळूणकर ( 68, रा. मांडवकरवाडी, कोळंबे, रत्नागिरी) आणि सिद्धेश दिपक गुरव ( 24, रा. दाभिळ आंबेरे ता. रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहे.गुरुवारी दुपारी प्रसाद दीपक मुरकर (23, रा. मागलाड-रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील दुचाकी ( एमएच-08- एएच -5122 ) वरुन नारायण वासुदेव चिपळणकर यांना मागे बसवून रत्नागिरी ते पावस रस्त्यावरुन वायंगणी फाटा येथील साळवी गार्डन येथे इंडिकेटर देऊन वळत असताना मागून भरधाव वेगाने येणारी दुचाकी ( एमएच-06 -एडब्ल्यू -0703) वरील चालक सिद्धेश गुरव याने जोरदार धडक दिली. या अपघातात चिपळूणकर व गुरव गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.










