आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जाऊन बोललो तर त्यांना परवडणार नाही
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा इशारा
सावंतवाडी । प्रतिनिधी : आदित्य ठाकरे माझ्यापेक्षा खुप लहान आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्या मतदार संघात येवून माझ्या विरोधात बोलताना मर्यादा पाळाव्यात. जर मी त्यांच्या मतदार संघात जावून बोललो तर त्यांना परवडणार नाही, असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला.
दरम्यान, महिला विधेयक मंजूर झाले असले तरी कोणाचे नुकसान होणार नाही. सभागृहातील काही जागा वाढविण्यात येणार आहे. त्यामुुळे महिलांची संख्या वाढली तरी ज्या चांगल्या व्यक्ती आहेत त्यांना निश्चितच स्थान मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी सावंतवाडीत मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टिका करताना त्यांच्या बद्दल काय बोलणार ते खोके सरकार मधील आहेत, असा आरोप केला होता.
याबाबत पत्रकारांनी केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, या ठिकाणी माझ्याच मतदार संघात येवून आदित्य ठाकरे माझ्या विरोधात बोलत असतील तर ते मी सहन करणार नाही. ते माझ्या पेक्षा खूप लहान आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्या विरोधात बोलताना मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. आज पर्यंत मी ठाकरे कुंटूबियांच्या विरोधात बोललो नाही. मात्र, त्यांनी अशीच टिका सुरू ठेवली तर मी त्यांच्या मतदार संघात जावून त्यांच्या विरोधात अनेक काही गोष्टी बोलू शकतो. मात्र, ते ठाकरेंना परवडणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी महिला विधेयकाच्या बाबत त्यांना विचारले असता केसरकर म्हणाले, या विधेयकामुळे नारी शक्तीचा खर्या अर्थाने विजय झाला आहे. विधेयक मंजूर झाल्याने याचा फायदा आता महिलांना होणार आहे. मात्र, सद्यस्थिती लक्षात घेता विरोधकांनी एकीकडे श्रेय घेण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे जागा कमी होणार आहे, अशी ओरड सुरू केली आहे. मात्र, या निर्णयामुळे जागा वाढणार आहेत. त्यामुळे ज्यांनी सभागृहात चांगले काम केले आहे. त्यांना निश्चितच पुन्हा सभागृहात येण्याची संधी मिळणार आहे, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.











