चिपळूण (प्रतिनिधी) : वाढत्या वृक्ष तोडीमुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. होणाऱ्या वृक्ष तोडीच्या पटीत वृक्षाची लागवड होत नसल्याने परिणामी पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. यातूनच निसर्गाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष तोड थांबवून वृक्ष लागवड करणे गरजेचे बनले आहे, असा संदेश चिपळूण महावितरण गणेशोत्सव मंडळाने साकारलेल्या देखाव्यातून दिला आहे.
सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असलेल्या चिपळूण महावितरण गणेशोत्सव मंडळाने मंगळवारी जल्लोषात बाप्पाचे आगमन केले. कोणत्या ना कोणता सामाजिक विषय घेऊन मंडळाकडून समाज जागृतीसाठीचे पाऊल उचलले जाते. यावर्षी मंडळाने सामाजिक संदेश देणारा देखावा सादर केला आहे. माणूस त्याच्या हव्यासापोटी निसर्गावर अतिक्रमण करत आहे. यात प्रामुख्याने वृक्षतोड आहे. बेसुमार होणारी वृक्षतोड लक्षात घेता त्यापटीत वृक्षाची लागवड होत नसल्याने पर्यावरणाची हानी होत असून त्याचा समतोल बिघडत आहे. त्यामुळे वृक्ष तोड थांबवून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे. वृक्ष संवर्धनासह बेटी बचावचा संदेशही देखाव्यातून दिला आहे. स्त्रीभ्रुण हत्येमुळे मुलीचा जन्मदर घटत आहे. हा प्रकार रोखणे गरजेचे बनले आहे. यासाठी लेक वाचवा असा समाज जागृतीपर माहिती सांगणारा विषय महावितरणने सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी येत असलेल्या गणेशभक्तांकडून कौतुक होत आहे.












