राजापूर तालुक्यातील सहा हजार गणरायांना गुरूवारी निरोप

राजापूर (वार्ताहर): गणपती बाप्पा मोरया.. वर्षी लवकर या अशी विनवणी करत बोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत गुरूवारी अनंत चतुर्दशीदिनी राजापूर शहरासह तालुक्यातील सहा हजारहुन अधिक गणपतींना पारंपरिक पद्धतीने निरोप देण्यात आला. यावेळी राजापूर शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

गेले दहा दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरूवारी अनंतचतुर्दशीला झाली. गेले दहा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमांनी सर्वत्र गणेशोत्सव मोठया उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. गणेशोत्सव काळात तालुक्यातील वातावरण भक्तीमय झाले होते.

राजापूर शहरासह ग्रामीण भागात पाचल, जैतापूर, नाटे, आडिवरे, ओणी, कोदवली व अन्य परिसरातील दहा दिवसांच्या गणरायांना मंगलमय वातावरणात निरोप देण्यात आला. सायंकाळी ४ वाजल्यापासून शहरात गणरायांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. आपल्या बाप्पाला निरोप देताना गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

शहरात गणपती विसर्जन असल्याने दुपारनंतर जवाहरचौकातील एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. शहरातील चव्हाणवाडी, रूमडेवाडी, खडपेवाडी, साखळकरवाडी, दिवटेवाडी, ओगलेवाडी, वरचीपेठ व अन्य परिसरातील गणरायांचे मिरवणुकीने थाटात गणेश घाटावर विसर्जन करण्यात आले.

विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी शहर व नजीकच्या गावातील भाविकानी मोठी गर्दी केली होती. गणेश विसर्जन घाटावर नगर परिषदेच्या वतीने प्रकाश व्यवस्था करण्यात आली होती. तर यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तालुक्यात अत्यंत शांततेत आणि भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.