बूथ सशक्तीकरण आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आगामी दौऱ्यानिमित्त देवरुख येथे भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

 

प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांसह जिल्हा कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित

देवरुख :‘महाविजय २०२४’च्या अनुषंगाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून मेळावे आणि अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येत आहेत. चिपळूण-संगमेश्वर विधानसभेतून लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य मिळण्यासाठी बूथ सशक्तीकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. यासाठी आज झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कोकण विभागाचे संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख व माजी आमदार प्रमोद जठार, रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांसह जिल्हा कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

प्रमोद अधटराव यांनी प्रस्तावनेच्या माध्यमातून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आगामी दौऱ्याचे महत्त्व विषद केले. यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांची ओळख पदाधिकाऱ्यांनी करून घेतली. संघटनमंत्री शैलेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्यांना सजगपणे कार्य करताना पक्षाला बळकटी मिळण्यासाठी . सतत कार्यरत रहावे आणि आपण दिवसभरात केलेल्या पक्षकार्याची नोंद आपल्या नोंदवहीत अचूकपणे करावी. अतुल काळसेकर यांनी मार्गदर्शनात सांगितले की प्रदेशाध्यक्षांचा दौरा ही एक संधी आहे याचा उचित लाभ उचलण्याचा कार्यकर्त्यांनी आवर्जून प्रयत्न करावा. या दौऱ्यानंतर आपल्या मनात लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी कोणताही किंतु-परंतु राहणार नाही.

लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार खास आपल्या शैलीत मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणत्या तरी निवडणुकीसाठी नाही तर भारतवर्षाच्या समृद्ध वारशाला जतन करण्यासाठी, पुढील पिढ्यांना हा वारसा सुपूर्द करण्यासाठी आपला संघर्ष आहे. ‘लोकमान्य’ टिळकांनंतर आपल्याला लाभलेले ‘जगन्मान्य’ नेतृत्व देशाला दिशा दाखवण्यात यशस्वी ठरले आहे. ३७० गेले… राममंदिर आले, तीन तलाक गेला… ३३% आरक्षण महिलांना मिळाले. ‘वसुधैव कुटुंबकम’ हा प्राचीन भारतीय संदेश एक राष्ट्रीय संकल्पना म्हणून पुढे घेऊन येण्यात यशस्वी ठरलेले मा. मोदीजी याच संदेशाला जगभर प्रसृत करून एकत्र आणतात ही गोष्ट अभिमानास्पद आहे. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ म्हणत मुक्त संचार करण्यावर माझा विश्वास आहे. आपण सर्वजण ‘शतप्रतिशत भाजपा’साठी कटिबद्ध आहोत.

जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले, प्रदेशाध्यक्ष आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी येणार आहेत. त्यांच्यासमोर येताना आपण जबाबदार कार्यकर्ते आहोत याचे भान राखून त्या तयारीत आलो पाहिजे. आपण सर्वांनी येणाऱ्या दौऱ्याला सकारात्मक प्रतिसाद देत लोकसभा विजयाचा विश्वास आपल्या नेतृत्त्वाला देण्यासाठी ८ ऑक्टोबरला मोठ्या संख्येने उपस्थित राहूया.

यावेळी भारतीय जनता पार्टी रत्नागिरी (उत्तर) चे उपाध्यक्ष श्री. रामदास राणे, जिल्हा सरचिटणीस श्री. सतेज नलावडे, जिल्हा सरचिटणीस श्री. अमित केतकर, जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सुजाता साळवी, संगमेश्वर (दक्षिण) तालुकाध्यक्ष श्री. रूपेश कदम, संगमेश्वर (उत्तर) तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के आदी नवनियुक्त प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.