रत्नागिरी:– फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेगाचे वारे 25 कि.मी. प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासात विमा कंपनीस टोल फ्री क्र.14447 वर किंवा कृषी विभागास तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२५-२६ मध्ये आंबा व काजू पिकाकरिता भारतीय कृषि विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात फळपीक विमा योजनेत आंबा पिकासाठी एकुण ३० हजार ८४२ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतलेला आहे. संभावित हवामान धोके महसूल मंडळनिहाय स्थापित केलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वेगाचा वारा, आर्द्रता इ. माहिती स्वयंचलितरित्या नोंदवली जाते. या माहितीच्या आधारे शासन निर्णयामध्ये निर्धारित केलेल्या कालावधीत हवामान धोके लागू झाल्यानंतर विमाधारक शेतकरी यांना नुकसान भरपाई लागू होते.
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण झाले असून वेगाचे वारे २५ कि.मी प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकाचे नुकसान झाले असल्यास फळपीकविमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासात विमा कंपनीस/कृषि विभागास तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. संबंधित विमा कंपनी, महसूल विभाग व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल, विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार दाखल न केल्यास फक्त संदर्भ हवामान केंद्रावरील वेगाच्या वाऱ्याची नोंद ही नुकसानभरपाईसाठी पात्र होणार नाही.
विमा परतावा मिळण्यासाठी आवश्यक असणारी हवामान प्रमाणके
आंबा पीकासाठी – वेगाचा वारा दि.१६ एप्रिल ते १५ मे – २५ कि.मी प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त (नुकसान झाल्यास ७२ तासात विमा कंपनीस/कृषि विभागास तक्रार करणे आवश्यक)
दि.१६ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग २५ कि.मी प्रति तास राहिल्यास नुकसानभरपाई रक्कम रु. २०,०३६/- प्रति हेक्टर देय राहील.
दि.१६ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग २५ कि.मी प्रति तास पेक्षा जास्त राहिल्यास नुकसानभरपाई रक्कम रु. ३४,०००/- प्रति हेक्टर देय राहील.












