संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न : विविध विषयांवर चर्चा
मालवण | प्रतिनिधी : संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या एकजुटीच्या जोरावर मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची गतिशील वाटचाल सुरु आहे. भारत गॅस, सिंधू बझार, खत गोडावून या प्रकल्पांसह येणाऱ्या काळात उत्त्पन्न वाढीच्या दृष्टीने पर्यटक निवास, मेडिकल, व्यापारी गाळ्यांच्या माध्यमातून व्यापार वृद्धी करण्यात येणार असल्याचे खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले.
मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सभा चेअरमन राजन गावकर यांच्या अध्यक्षतेखाली दैवेज्ञ भवन येथे पार पडली. यावेळी व्हा. चेअरमन कृष्णा ढोलम, संचालक महेश मांजरेकर, के. पी चव्हाण, अशोक तोडणकर, विजय ढोलम, प्रफुल्ल प्रभू, महेश गावकर, अमित गावडे, रमेश हडकर, सुरेश चौकेकर, अभय प्रभुदेसाई, राजेंद्र प्रभुदेसाई, सरोज परब, व्यवस्थापक रघुनाथ चव्हाण, यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच नवनिर्वाचित संचालकांचा अभिनंदनाचा ठराव अनिल न्हिवेकर यांनी मांडला. चतुर्थी कालावधीत यंदाचे कडधान्य चांगल्या दर्जाचे होते. या काळात अधिक क्षमतेने व तत्परतेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अभिनंदन ठराव राजन भोजणे यांनी मांडला. मागील इतिवृत्त वाचून त्याला मंजुरी देताना दोन्ही अभिनंदन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा प्रश्न मागील सभेत विचारण्यात आला होता. किमान वेतन लागू झाले ? न झाल्यास केव्हा सुरु होणार असा प्रश्न नंदू देसाई, राजन भोजणे, संतोष लुडबे यांनी उपास्थित केला. तर कर्मचाऱ्यांनी पण संस्थेचं उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. संस्थेचं उत्पन्न वाढले तर कर्मचाऱ्यांनाही वाढीव पगार देण्याबाबत संस्थेला अडचण येणार नाही असे दाजी हडकर यांनी सांगितले. यावर चेअरमन राजन गावकर यांनी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याबाबत संचालक मंडळात चर्चा सुरु असून कर्मचाऱ्यांना नाराज करणार नाही. संस्थेचा फायदा तोटा पाहून कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय देऊ असे चेअरमन राजन गावकर यांनी स्पष्ट केले.
सभासद शेअर्स किमान 250 वरून ही एक हजार करण्यात यावी. गेली कित्येक वर्षे हा विषय रेंगाळेलेला आहे. त्यामुळे आता तरी हा विषय गांभीर्याने घेऊन सभासद एक हजार करण्यात यावी अशी मागणी कृष्णनाथ तांडेल यांनी केली. मात्र, महेश लुडबे यांनी याला विरोध करत ती 250 रुपयेचं ठेवण्यात यावा, त्यात कोणतीही वाढ करण्यात येऊ नये असे सांगितले. अहवालात अनेक बारीक बारीक चुका आहेत. पुढच्या वेळी या चुका टाळा असे बाळू अंधारी यांनी सांगितले.
ज्या सभासदांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केले त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये हर्षल किशोर धुरी, वैश्विका नागेश कदम, प्रणिता शत्रुघ्न आईर, तन्मयी आनंद परब, रितीश नागेश अटक, कोमल पांडुरंग राणे, कोमल चंद्रशेखर गावडे, सानिका संजय कांदळगावकर, या विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला. तर संस्थेचे आदर्श ग्राहक म्हणून प्रशांत अंकुश मयेकर, रसिका मालवणकर तसेच आदर्श विकास संस्था म्हणून श्री रामेश्वर विकास सेवा सोसायटी चिंदर यांचा सत्कार करण्यात आला. या सर्व सत्कारांचा मान यावेळी उपस्थित जेष्ठ सभासदांना देण्यात आला. आभार मानताना संचालक महेश मांजरेकर यांनी वाढलेले ग्राहक, सभासद, आणि संस्थेच्या पुढील प्रकल्पांची माहिती दिली.










