जिल्ह्यातील आंबा- काजू बागायतदार फळ पिक विमा रकमेच्या प्रतीक्षेत

कोणी वाली आहे का ? बागायतदारांमध्ये प्रचंड संताप ! तातडीने रक्कम जमा करण्याची आग्रही मागणी !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — चार महिने उलटून गेले तरी, अजूनही फळपीक विम्याची रक्कम, बागायतदारांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बागायतदारांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे. याबद्दल स्थानिक आमदार-लोकप्रतिनिधींनी अधिवेशन काळात आवाज उठवला. परंतु कार्यवाही न झाल्याने, त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचला की नाही ? याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. विरोधी पक्षाने याबाबत लाक्षणिक उपोषण करून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही त्यांचे प्रयत्न अपुरे पडल्याचे दिसते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी- बागायतदार यांचा वाली कोणी नाही का? कि सरकार बागायतदारांच्या आत्महत्येच्या प्रतीक्षेत आहे ? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

वस्तुतः हंगाम संपल्यानंतर ४५ दिवसात, विमा कंपनीकडून बागायतदारांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा होणे अपेक्षित आहे.परंतु सरकार आणि विमा कंपनी यांच्या ‘चोर- शिपाई’ खेळात बागायतदार होरपळला जात आहे. उधारी- उसनवारी करून विमा हप्ता भरलेल्या बागायतदारांना, त्यांच्या बागेमध्ये वेळेवर रक्कम मिळाली नाही तर, हंगाम किंवा निसर्ग थांबून राहत नाही. अन् शेतकऱ्याला नुकसानीस सामोरे जावे लागते.

त्यामुळे शासनाने या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गांभीर्याने लक्ष देऊन, आणि आणि जिल्हा- तालुक्यातील आमदार- लोकप्रतिनिधींनी त्याचा पाठपुरावा करून, दरवर्षी निकषाप्रमाणे जास्तीत जास्त फळ विम्याची रक्कम, बागायतदारांच्या खाती वेळेवर जमा करण्याची कार्यवाही व आदेश तातडीने निर्गमित होऊन, दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी शेतकरी बागायतदार यांचे कडून होत आहे. त्यामुळे आंबा-बोर्ड पाहिजेच, परंतु बागायतदारांची लूट करणाऱ्या विमा कंपन्यांकडून नेहमी वेळेवर विमा रक्कम जमा होणे ही गरजेचे आहे. अन्यथा बागायतदारांचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे…..