
सावंतवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांना सावंतवाडीतील एका बिल्डरच्या तक्रारीवरून ५० हजाराची लाच ठेवलेली ती पावडर हाताला लागली. यावरून सागर खंडागळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सारं प्रकरणच संशय येणारं आणि शंका उपस्थित करणारं आहे. आजकाल शासकीय सेवेत धुतल्या तांदळासारखे कोण ? असा प्रश्न जरी उपस्थित होणारा असला तरीही फाटलेल्या आभाळातही अनेकजण किमान स्वत:च स्वत्व राखुन काम करणारे अधिकारी आणि शासकीय सेवेतील कर्मचारीही आहेत. ही टक्केवारी कदाचित दोन, पाच, दहा टक्केही असू शकेल.मुळातच लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने गुन्हा आहे. असे फलक प्रत्येक शासकिय कार्यालयात लटकत असले तरीही दिल्या घेतल्या शिवाय कामच होत नाहीत हे उघड सत्य दुर्दैवाने समाजमान्य होत चाललंय. पोलिस असो किंवा महसुलचा कर्मचारी त्यांच्या-त्यांच्या लाच
घेण्याच्या, मागण्याच्या आणि स्विकारण्याच्या अशा काही पद्धती आहेत. कोणत्याही कामासाठी अडचणीत असलेल्याची अडवणुक करायची. अडवणुक करून त्याला ब्लॅकमेलिंग करायचं. हा जो काही प्रकार आहे या प्रकारात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्लॅकमेलिंग करून दामदुप्पट पैसे उकळले जातात. आणखी एक प्रकार कोणताही गाजावाजा न करता जे हाती पडेल ते स्विकारून गप्प बसायचे. यात आणखी म्हणजे थेट एवढेच हवेत म्हणून मागणी करणे अशा या काही लाच घेण्याच्या पद्धती झाल्या आहे. ए.पी.आय. सागर खंडागळे दोन-तीन वर्ष कणकवली पोलिस स्टेशनला होते. वैभववाडी पोलिस स्टेशनलाही होते. परंतु ते कधीही वादग्रस्त ठरलेले नाहीत. कायद्याचा उत्तम अभ्यास असणारा सिंधुदुर्ग पोलिस दलातील अधिकारी अशीच त्यांची ओळख राहिली आहे. कोणत्याही गुन्हे कामातील तपासातील ड्राफ्टींग हे उत्तम राहिले आहे. यामुळे सागर खंडागळे यांना लाचलुचपत विभागाने पकडले ही न्यूज जरी न्यूज असली तरीही त्याची काहीतरी दुसरी बाजू निश्चितच असणार आणि आहे. या प्रकरणातील तक्रारदार सिद्धांत परब यांच्या तक्रारीवरूनच लाचलुचपत विभागाने सापळा रचून पकडले. सिद्धांत परब यांच्या संबंधीचे एक प्रकरण सावंतवाडी पोलिस स्टेशनला दाखल श्री.पवार नामक व्यक्तीने त्याची फसवणुक केल्याची तक्रार श्री.परब यांच्या विरोधात करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासकामात लाच मागितल्याचे लाचलुचपत विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सावंतवाडी पोलिस स्टेशनमध्ये सागर खंडागळे ज्यांना खटकत होते. त्यापैकी खाकीवर्दीतील कोणी फार विचारपूर्वक हे करायला लावलंय का ? सावंतवाडी पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे रजेवर असतानाचा हा ‘मुहूर्त’ साधला गेल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणात लाचलुचपत विभाग त्यांच्या पद्धतीने कायदेशीररित्या योग्य असणारी कार्यवाही करतीलच परंतु त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणी दोषी आहेत का ? याचा शोधही घेतला जायला हवा. सागर खंडागळे या एका अभ्यासू अधिकाऱ्याला अडचणीत कोणी आणलंय का ? की चुकीच्या संगतीमुळे असं काही चुकीच काम करण्याकडे त्यांच मन झुकलं. शेवटी ‘पैसा हे सब कुछ सुधारता है बहोत कुछ बिगाडता भी है’ हे असंच असत. जाणीव, भान आणि सावधानता असावी लागते. निव्वळ आपण चांगले असून चालत नाही. तर आजच्या स्थितीत सावधही असायला हव आणि प्रलोभनांपासून दूर रहात प्रामाणिकपणे काम करत रहायला हव. नांव मिळविण्यासाठी खूप वर्ष
जातात. परंतु नाव गमावण्यासाठी एखादा क्षण पुरेसा ठरतो. तो क्षण येऊ द्यायचा नाही याची काळजी सर्वांनाच घ्यावी लागेल. ए.पी.आय सागर खंडागळेंनी कालपर्यंत एक प्रामाणिक अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांच्या सावंतवाडी पोलिस स्टेशनला हाताला लागलेली लाचलुचपत विभागाची लागलेली पावडर कशी लागली ? ही पावडर लागावी म्हणून खाकीवर्दीतील कोणी प्रयत्नशील होते का ? हा शोध सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी घ्यावा. वरकरणी ‘सब कुछ अच्छा’ अस जे काही सिंधुदुर्ग पोलिस दलात वाटतंय तसं नाही आहे. लाचलुचपत
विभाग यासंबंधी जी योग्य, कायदेशीर असेल ती कारवाई करेलच परंतु त्याचबरोबर पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे. लाचलुचपत विभागात आणखी ‘सूरज’ होण्यापूर्वीच हे थांबावं !










