महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे १९ रोजी धरणे आंदोलन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विज्ञान विषय समूहातील पदोन्नत्या गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आहेत. विज्ञान विषय समूहातील शिक्षकांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील कार्यरत प्राथमिक शिक्षकांमधील विज्ञान समूहातील पदवीधर शिक्षकांना पवित्र पोर्टल भरतीपूर्वी विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक विभागगाच्यावतीने पदाविधाराकांसह गुरूवारी १९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समोर सायंकाळी ३ ते ५ या वेळेत धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

इयत्ता ६ वी ते ८ वी साठी कठीण समजले जाणारे गणित व विज्ञान हे दोन विषय पदवीधर शिक्षकांनी शिकविणे अपेक्षित आहे. मात्र गणित व विज्ञान विषय शिकविण्यासाठी पदवीधर शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे इतिहास, भूगोल किंवा मराठी आदी विषयांच्या पदवीधर शिक्षकांना सध्या गणित व विज्ञान हे विषय शिकवावे लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणित व विज्ञान या दोनही विषयांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत चालू असणाऱ्या ६ वी ते ८ वी वरिष्ठ प्राथमिक शाळेत गणित- विज्ञान विषय शिक्षकांच्या एकूण मंजूर ३०९ पदापैकी २२४ पदे अद्यापही रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून गणित – विज्ञान अध्यापनाच्या दर्जावर विपरीत परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

शिक्षकांअभावी गुणवत्ता खालावत चालल्यामुळे शाळांची पटसंख्याही धोक्यात येऊ लागली आहे. RTE Act 2009 नुसार प्रत्येक वरिष्ठ प्राथमिक शाळेत एक विज्ञान विषय शिक्षक उपलब्ध असणे बंधनकारक आहे. शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन निर्णय १६ डिसेंबर २०१३ नुसार वरिष्ठ प्राथमिक शाळेत पहिले पद हे गणित-विज्ञान शिक्षका करता अनिवार्य आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने प्राथमिक शिक्षकांसाठी V92 या अभ्यासक्रमांतर्गत विज्ञान पदवी धारण करण्याची संधी दिलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या काही प्राथमिक शिक्षकांनी यातून विज्ञान पदवी प्राप्त केलेली आहे. तसेच काही शिक्षकांनी विज्ञान पदवीसाठीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रात प्रवेशही घेतला आहे.

तीन वर्षांपूर्वी २०२० मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ विज्ञान पदवीधारक शिक्षकांना पदोन्नती देण्यात आलेली. होती.त्याचप्रमाणे या शिक्षकांसाठी विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती कार्यक्रम आगामी शिक्षक भरतीपूर्वी त्वरीत राबवावा अशी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग प्राथमिक विभागाची मागणी आहे. त्यामुळे या मागणीसाठीच हे धरणे आंदोलन छेडण्यात येणार असून या धरणे आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज्ञान पदवीधारकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग प्राथमिक विभागगाचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी केले आहे.