हायहोल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा

विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर सलग आठवा विजय

रोहितची धडाकेबाज कप्तानी खेळी : श्रेयसचेही अर्धशतक

अहमदाबाद : कर्णधार रोहित शर्माच्या धडाकेबाज ८६ धावा व श्रेयस अय्यरच्या नाबाद ५५ धावांच्या खेळीच्या जोरावर विश्वचषकातील महा मुकाबल्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळविला. त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाने भारतीय गोलंदाजांसमोर अक्षरशः शरणागती पत्करल्याने पाकिस्तानचा पूर्ण संघ केवळ १९१ धावांवर गारद झाला होता. या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भारतीय संघाला पारंपारिक प्रतिस्पर्ध्यासमोर दणदणीत विजय प्राप्त करून दिला.
विश्वचषकाच्या १२व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. भारताने या स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताचे आता तीन सामन्यांत ६ गुण झाले आहेत.टीम इंडियाचा पुढचा सामना १९ ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशशी होणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ २० तारखेला बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.