कोकणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पुणेकरांचा पुढाकार

रत्नागिरीकरांचे मिळतेय सहकार्य

रत्नागिरी : कोकण हे निसर्गसौंदर्याने नटलेलं आणि प्रत्येकालाच भुरळ पाडणारं आहे. या भूमीने सर्वांना भरभरून दिलं आहे, त्यामुळे कोकणासाठी आपल्याला काय करता येईल? असा विचार पुण्यातील मुळशी येथील नाना मारणे व त्यांच्या कुटुंबियांनी केला. कोकणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी या पुणेकरांनी पुढाकार घेतला आहे.

 

रत्नागिरीतील पर्यटनस्थळे दाखवण्यासाठी त्यांनी देवराई मॅंगोज हे यु ट्यूब चॅनेल बनवले असून आतापर्यंत ग्रामदैवत श्री भैरी देवस्थान, पावस येथे श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर, मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक, रत्नदुर्ग किल्ला, गणपतीपुळे, मत्स्यालय, पूर्णगड आदी १५ ठिकाणांचे व्हिडिओ बनवले आहेत. त्यांच्या या चॅनेलला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

कोकणाप्रती वाटणारं प्रेम आणि तिकडच्या कष्टकरी हातांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘देवराई मँगोज’ या नावाने गेली काही वर्षे कोकणातील आंबा पुणेकरांच्या सेवेत ते हजर करत आहेतच. पण आता त्यापुढे जाऊन हेच कोकण सर्वदूर पोहोचावं आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी ‘देवराई मँगोज’ या नावाने त्यांनी युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. पुण्यातीलच दृश्यम् स्टोरीज या संस्थेने देवराईसोबत ‘Explore Kokan with Devrai’ या सिरीजची निर्मिती केली आहे. याद्वारे रत्नागिरीतील महत्त्वाच्या स्थळांची माहिती उत्तमरीत्या मांडली आहे.

 

गेली अनेक वर्ष निवेदन, सूत्रसंचालन आणि जाहिरात क्षेत्रात काम करणारी रत्नागिरीचीच सायली खेडेकर या मालिकेचे निवेदन करत आहे. तर विविध विषय डॉक्युमेंटरीद्वारे मांडणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फिल्ममेकर राहुल नरवणे या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. यासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून पुण्याचे अभिजित रंधावे, सनी कुंभार, ग्राफिक्स परशुराम कंबार तर एडिटिंगसाठी वैभव रंधावे व रत्नागिरीचाच मयूर दळी यांनी सहकार्य केले आहे. या सीरिजसाठी देवराई मॅन्गोजचे विनायक मारणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या प्रयत्नाने सुरू असलेला हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा या साठी देवराईच्या चॅनेलला सबस्क्राईब करून जरूर शेअर करा. link- https://youtube.com/@DevraiMangoes असे आवाहन श्री. मारणे यांनी केले आहे.