सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पडला पाऊस

कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग च्या सह्याद्री पट्ट्यात मुसळधार

भात पिकाचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदार दिलं

संतोष राऊळ (कणकवली)
घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडला. कुडाळ,कणकवली,सावंतवाडी या तालुक्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कणकवलीच्या काही भागात गाराही पडल्या.सायंकाळी साडेचार वाजल्यापासून जिल्हाच्या बहुतांशी भागात जोरदार गडगडाट व विजा चमकू लागल्या. त्यानंतर काही वेळातच मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे पिकलेल्या भात पीकाचे नुकसान झाले. काही ठिकाणी उभे असलेले भात पीक आडवे होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
तसेच घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी पाऊस झाल्याने पुढील नऊ दिवस पाऊस सुरू राहण्याची अटकळ शेतकऱ्यांनी बांधली आहे. हा परतीचा पाऊस असा सुरू राहिला तर हाता तोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. तालुक्यात हळवी भात शेती कापणी योग्य झाली असून, अनेक ठिकाणी भात पिकाची कापणी देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र या कापणीच्या तोंडावर सायंकाळच्या सत्रात गेले चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे आज अधिकच जोर केल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीत अजूनच भर पडणार आहे. दरम्यान विज पडून सुद्धा काही ठिकाणी नुकसान झाले आहे.