वैभववाडीत जोरदार पाऊस : नापणे येथे घरावर कोसळले झाड

L

वैभववाडी | प्रतिनिधी 

सायंकाळी तालुक्यात वीजाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. या जोरदार पावसाने नापणे जैतापकरवाडी येथील एका घरावर झाड पडल्यामुळे घराचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी घटस्थापना असल्यामुळे नवराञ उत्सव मंडळाची जोरदार तयारी सुरु असून या पावसाने त्यात व्यत्यय आला. तालूक्यात भात कापणीला सुरुवात झाली असून या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर सायंकाळी उशीरापर्यंत वीज पुरवठा खंडीत झाला होता.

गेले दोन दिवस तालुक्यात सायंकाळी ढगाळवातावरण तयार झाले होते. सायंकाळी ६ वाजल्यापासून तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्टयातील गावात जोरादार पाऊस झाला. वीजांच्या गडगडाटासह झाल्याले पावसाने सर्वांची एकच तारांबळ उडाली. या पावसाने नापणे कोकाटेवाडी येथील अंजली अनंत खाडये यांच्या घरावर झाड पडल्यामुळे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यात सध्या भात कापणीला सुरुवात झाली असून या पावसाने कापणीच्या कामात व्यत्यय आला. तर शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसाने चांगलीच तारांबळ उडाली.