लोटे परिसरात अजूनही गुटखा विक्री तेजीत

विक्रेत्यांवर कारवाई; गुटखा येतो कोठून?
खेड | प्रतिनिधी : मागील दोन महिन्यांपूर्वी  तसेच दोन दिवसा पूर्वी खेड तालुक्यातील लोटे व घाणेखुंट येथे खेड पोलिसांनी छापा टाकून लाखो रुपयांचा गुटखा जप्त करत विक्रेत्यावर कडक कारवाई केली होती. त्यानंतर ‘त्या’ विक्रेत्याकडे गुटखा विक्री बंद असली तरी परिसरात अजूनही गुटख्याची विक्री तेजीत सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा गुटखा येतोय कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी मोहीम कडक करण्यात आली आहे. याच धर्तीवर खेड पोलिसांनीही अनेक अवैध धंदे उद्ध्वस्त केले आहेत. याचाच एक भाग म्हणून लोटे घाणेखुंट येथील परप्रांतीय विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करून याला आळा घालण्यात पोलिस यंत्रणा यशस्वी ठरली.
या कारवाईनंतर परिसरातील गुटखा विक्रीचे प्रमाण कमी होण्याची आशा होती. मात्र, परिसरात गुटखा खाणाऱ्यांना तो अजूनही सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे आता हा गुटखा नेमका कोठून येत आहे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. लोटे परिसरात येणाऱ्या गुटख्याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.