काजू पीक विमा भरपाईत दोडामार्ग तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या हाती ‘भोपळा’

शेतकऱ्यांमध्ये संताप

दोडामार्ग  : प्रवीण परब : पिक विमा नुकसान भरपाईत दोडामार्ग तालुक्यातील काजू उत्पादकांच्या पदरी निराशा पडली आहे. तालुक्यात ४५० हेक्टरहून अधिक क्षेत्रात तब्बल ९७४ शेतकऱ्यांनी मेहनतीने काजू बागायती केली आहे. मात्र विविध मुदतीत विमा रक्कम भरूनही विमा कंपनीने हवामानाचे कारण दाखवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारली आहे. विमा कंपनीच्या एकाधिकारशाही कारभाराबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन विमा कंपनीला जाब विचारणे गरजेचे आहे.

दोडामार्ग तालुक्यात भेडशी, कसई दोडामार्ग, कोनाळ व तळकट असे एकूण चार महसूली सर्कल आहेत. पैकी केवळ तळकट व भेडशी या ठिकाणी हवामान मोजमापन केंद्र आहेत. विमा कंपनी क्लायमेट या शासकीय संस्थेकडून हवामानाचा डेटा गोळा करून त्यावर आधारित विमा रक्कम जाहीर करते. १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान अवेळी ५ मिली मीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्यास तसेच १३ डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान झाल्यास नुकसान भरपाई दिली जाते.

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक काजू पीक घेतले जाते. या ठिकाणी आंबा उत्पादन अत्यल्प आहे. तब्बल ४५० हेक्टर होऊन अधिक क्षेत्रावर एकूण ९७४ शेतकऱ्यांनी काजू उत्पादन घेतले आहे. तर केवळ ४३ हेक्टर वर आंबा उत्पादन घेण्यात येते. तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकूण ८५ लाख ६६ हजार ९१२ रुपये पिक विमा रक्कम भरली होती. त्यानुसार ४ कोटी ५० लाख ८९ हजार १० रुपये भरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र विमा कंपनीने हवामान मापक यंत्राकडे बोट दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत. केवळ १०८ आंबा उत्पादक शेतकऱ्याना १३ लाख ७७ हजार ९२ रुपयांची भरपाई मिळाली आहे.

मुळात दोडामार्ग तालुकास्तरावर केवळ दोन हवामान मोजमापक यंत्रे बसवून त्यानुसार भरपाई निकष ठरविणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता सर्वपक्षीयांनी एकत्र येणे आवश्यक आहे. विमा कंपनीला याबाबतचा विचारला गेला पाहिजे.

दोडामार्ग तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई न मिळणे ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. केवळ दोन पर्जन्यमापक यंत्रांवरून संपूर्ण तालुक्याचा निकष ठरवणे हास्यस्पद आहे. मुळात अवकाळी पाऊस गावागावानुसार कमी अधिक कोसळतो. बँका व सोसायटी यांनी संबंधित कर्जदार शेतकऱ्यांचा विमा परस्पर भरणे आवश्यक आहे.

चंद्रशेखर देसाई, प्रगतशील काजू बागायतदार, शिरवल

दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर काजू पीक घेतले जाते. अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. यातून आर्थिक आधार मिळावा यासाठी शेतकऱ्यांकडून विमा भरला जातो. मात्र विमा कंपन्यांचे निकष शेतकऱ्यांना भरपाई कशी मिळू नये यासाठीच असतात.

अजित देसाई, सरपंच, कळणे ग्रामपंचायत