आरोपींतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई व यतीश खानोलकर यांनी काम पाहीले
मालवण | प्रतिनिधी : मालवण भरडनाका येथे वाहतूक नियंत्रणासाठी असलेल्या पोलीसाना सरकारी कामात अडथळा करून मारण्यासाठी अंगावर धावून आल्याच्या आरोपातून मंदार सुनिल कांदळकर वय ३७, अनिल चंद्रकांत कांदळकर ५५, कुणाल किशोर खानोलकर वय २९, ज्ञानदेव दत्ताराम पाटकर वय ४७ सर्व राह. मालवण, ता. मालवण यांची ओरोस येथील मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे
ॲड. स्वरूप नारायण पई व यतीश खानोलकर यांनी काम पाहीले.
जानेवारी २०१८ रोजी भरड-मालवण येथे वाहतूक पोलिसानी आरोपींची दुचाकी तपासणीकरीता थांबवून गाडीची पुढील नंबरप्लेट व आरसे नसल्याने आरोपी मंदार कांदळकर यांचेकडे गाडीचे कागदपत्र मागितल्यावर आरोपीने कागदपत्र दाखविले नाहीत व तडजोड शुल्क भरण्यासही नकार दिला व त्यासोबत अन्य मित्रांना बोलावून आरडाओरडा करून वाहतुक पोलिसाच्या अंगावर धावून गेल्याने फिर्यादी सुरजसिंग ठाकूर यांनी मालवण पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरुदृध तक्रार दिली. त्यावरून मालवण पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३५३, ३५२, ५०६, ३४ मोटरवाहन अधि. १९८८ चे कलम १३०(१), १७७, १६१, ३२ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ चे कलम ५० अन्वये आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी आरोपींविरूध्द तपासकाम करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेले होते.
याकामी सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीचे व साश्वीदारांचे जबाबातील विसंगती, तपासकामातील त्रुटी व आरोपींतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद विचारात घेवून ओरोस येथील मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.











