आजारी मुलास पाहण्यास जाताना झाला अपघात
मसुरे | झुंजार पेडणेकर :वेरली थळकरवाडी येथील दिनेश अनंत वेरलकर (६२ वर्ष) यांचे रविवारी सायंकाळी गोवा बांबोळी येथे उपचारा दरम्यान निधन झाले. जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचार घेत असलेल्या आपल्या मुलाच्या सोबत राहण्यासाठी ते रविवारी सकाळी ओरोस येथे निघाले होते. परंतु जिल्हा रुग्णालया नजीक एका चार चाकी सोबत झालेल्या अपघातामध्ये ते जखमी झाले होते. डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले होते. परंतु उपचार चालू असतानाच त्यांचे दुर्दैवी निधन झाले.
दिनेश वेरलकर हे मेस्त्री कारागीर म्हणून देऊळवाडा येथील स्वा मिलवर कार्यरत होते. ते उत्कृष्ट भजनी बुवा आणि नाट्यकर्मी सुद्धा होते. अनेक संगीत नाटकात त्यांनी स्वतः भूमिका साकारल्या होत्या. पंचक्रोशीत ते दिनेश मेस्त्री या टोपण नावाने ओळखले जात. तसेच उत्कृष्ट हॉलीबॉलपटू म्हणून सुद्धा त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, पुतणे, मेहुणे, बहीण, भाचा असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी रवींद्र वेरलकर यांचे ते भाऊ तर इलेक्ट्रिशियन चेतन वेरलकर यांचे वडील होत.












