पीक विमा व भात विक्री नोंदणीला १० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ द्या

मडूरा सोसायटीची प्रशासनाकडे मागणी

बांदा | प्रतिनिधी : शेतकऱ्यांना यंदा पीक विमा बराच उशिराने मिळाला. तर बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप मिळालेलाही नाही. पीक विमा व भात विक्री नोंद करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. ई पीक ॲपचा सर्व्हर गेले आठ दिवस बंद आहे. ई पीक नोंदणी सातबारा मिळत नसल्याने विमा पॉलिसी होत नाही. पीक विमा व भात नोंदणी करण्यास १० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ मिळावी, अशा मागणीचे निवेदन मडूरा सोसायटी चेअरमन ज्ञानेश परब यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना सादर केले.

     सावंतवाडी तहसीलदार कार्यालयांत ज्ञानेश परब यांनी नायब तहसीलदार मनोज मुसळे यांना निवेदन सादर केले. यावेळी सोसायटी संचालक सुरेश गावडे, लाडू परब उपस्थित होते. यावेळी परब यांनी प्रशासना समोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात विमा भरपाई मिळते. मात्र यंदा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस मिळाली. काही जणांना अद्यापही मिळालेली नाही. मुळात काजू, आंबा बागायतदारांचे लहरी हवामानामुळे अतोनात नुकसान झाले. शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आल्याने खिशातून विमा भरणे शक्य नाही.

तसेच ग्रामीण भागात नेटवर्क समस्या असल्याने ई पिक नोंद करण्यात अडचणी येत आहेत. शिवाय गेले आठ दिवस ॲपचा सर्व्हर डाऊन असल्याने ई पीक नोंद करणे शक्य झालेले नाही. ई पीक नोंदणी तसेच भात नोंदणी अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. अशा अवस्थेत पीक नोंदणी करणे व वीमा भरणे अशक्य आहे. त्यामुळे हजारो शेतकरी वीमा योजना तसेच भाताच्या हमी रकमेपासून वंचित राहण्याची भीती असल्याचे स्पष्ट केले. यावेळी श्री. मुसळे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोचविण्यात येईल असे स्पष्ट केले.