धनादेश न वाठल्याप्रकरणी आरोपीला 2 वर्षे सक्तमजुरी, दंड आणि व्याजासकट रक्कम देण्याची शिक्षा

रत्नागिरी ः प्रतिनिधी : धनादेश बॅंकेत न वठल्या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोन वर्षे सक्तमजूरी तसेच २५ हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद तसेच नुकसान भरपाई पोटी धनादेशाची रक्कम ३ लाख व त्यावर धनादेशाचे तारखेपासून व्यावसायिक शेकडा १८ टक्के व्याज फिर्यादीला देण्याची शिक्षा ठोठावली. आसिफ हसनमियॉ सोलकर (रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना ३१ मे २०१६ ला घडली होती. नुरजहॉ खलील होडेकर (रा. मिरकरवाडा-रत्नागिरी) यांनी संशयित आसिफ सोलकरला ३ लाख रुपये व्यवसायिक अडचणीसाठी दिले होते. त्यावेळी लेखी करार करण्यात आला होता.

रक्मेची परतफेडीसाठी संशयित सोलकरने २२ जानेवारी २०१८ ला दीड लाख रुपयांचे दोन धनादेश होडेकर यांना दिले होते. धनादेश बॅंकेत वठविण्यासाठी टाकले असता ते पुरेशी रक्कम नसल्यामुळे वटले नाहीत. त्यामुळे होडेकर यांनी सोलकर विरुद्ध न्यायालयात धनादेश वठला नसल्याचा खटला दाखल केला. त्यामध्ये पुराव्या अंती सोलकरला न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्ष सक्तमजूरी व २५ हजाराचा दंड, दंड न भरलेस तीन महिने साधी कैद तसेच नुकसान भरपाई पोटी धनादेशाची रक्कम ३ लाख व त्यावर धनादेशाचे तारखेपासून व्यावसायिक शेकडा १८ टक्के व्याज होडेकर यांना देण्याची शिक्षा ठोठावली.