प्रदेशमंत्री म्हणून संकल्प फळदेसाई यांची २०२३-२४ वर्षाकरिता निवड
रत्नागिरी :
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोंकण प्रदेश अध्यक्षपदी प्रा. श्रीकांत दुदगीकर तर प्रदेशमंत्री म्हणून संकल्प फळदेसाई यांची निवड करण्यात आली. ही घोषणा निर्वाचन अधिकारी प्रा. डॉ. वरदराज बापट यांनी मुंबई येथे केली. दिल्ली येथे दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोंकण प्रदेशाच्या ५८ व्या प्रदेश अधिवेशनामध्ये र्निर्वाचित प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश मंत्री आपला पदभार स्वीकारतील.
प्रा. श्रीकांत दुदगीकर (प्रदेश अध्यक्ष) :
२०१३ पासून अभाविपच्या कार्यात आहेत. M.Com, LLB पर्यंत शिक्षण पुर्ण झाले आहे. रत्नागिरी येथील गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात वाणिज्य विषयाचे अध्यापन करतात. कोंकणातील नामवंत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे आजीव सभासद, मंडळाचे सचिव आणि नियामक मंडळ सदस्य आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या “Advanced Costing and Auditing” या विषयाच्या पुस्तकाचे लेखन केले आहे. यापूर्वी रत्नागिरी शहर उपाध्यक्ष, रत्नागिरी शहर अध्यक्ष, कोंकण प्रदेश उपाध्यक्ष, अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या रत्नागिरी विभाग प्रमुख अशी जबाबदारी आहे. वर्ष २०२३-२४ साठी कोंकण प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांची फेर निवड करण्यात आली असून निवास रत्नागिरी येथे आहे.
संकल्प फळदेसाई (प्रदेश मंत्री) :
मूळ गोव्याचा कार्यकर्ता आहे. गोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून B. E. Computer Engineering पर्यंत शिक्षण पूर्ण झालं आहे. २०१८ साली १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी गोव्यात झालेल्या आंदोलना पासून विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात असून २०२२ पासून विस्तारक म्हणून काम करत आहे. पणजी महानगर मंत्री, दक्षिण गोवा जिल्हा संयोजक, गोवा विभाग संयोजक, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, मुंबई महानगर तंत्रशिक्षण विद्यार्थी कार्य प्रमुख अशा अनेक जबाबदाऱ्यांचे निर्वाहन केले आहे. २०१९ च्या गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळ निवडणुकीत अभाविपतर्फे अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली आहे. डीपेक्सच्या आयोजन समितीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
आंतरराज्य छात्र जीवन दर्शन अध्ययन यात्रेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०१९ मध्ये त्रिपुरा राज्यात प्रवास करून तेथील जनजाती समाजाची संस्कृती या विषयावर अध्ययन केलेले आहे. कोरोना काळात गोवा विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेमधील वेळापत्रकातील गोंधळ, परीक्षा शुल्क तसेच परीक्षा वेळापत्रकात सुधारणा करण्या संदर्भात आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. गोवा विद्यापीठात अचानक वाढलेल्या फी कमी करण्यासाठी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. स्वावलंबी भारत अभियानाच्या अंतर्गत मुंबईमधील विद्यार्थ्यांमधल्या उद्योजकतेला प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न केले आहे. सध्या नवी मुंबई जिल्हा विद्यार्थी विस्तारक व कोंकण प्रदेश तंत्र शिक्षण विद्यार्थी कार्य संयोजक अशी जबाबदारी आहे.वर्ष २०२३-२४ साठी कोंकण प्रदेश मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली असून केंद्र नवी मुंबई आहे.











