मालवण | प्रतिनिधी : नौसेना दिन सोहळा नागरिकांना पाहता यावा यासाठी एसटी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध एसटी आगारातून तब्बल २६६ गाड्या गावागावातून प्रवाशांना घेवून तारकर्ली येथील सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. शहरातील दांडी आवार याठिकाणी सर्व गाड्या थांबविण्यात येणार असून तेथून सर्व प्रवाशांना भव्य मंडपात बसून कार्यक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे. हजारो माणसे या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.
या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम न भुतो न भविष्यती असाच होणार असल्याचे सांगत सर्व प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. मालवण तालुक्यातून ४८ गाड्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. सर्व गाड्या रात्री वस्तीला त्या त्या गावात जाणार असून सकाळी लवकर प्रवासी वर्गाला घेऊन गाड्या मालवण शहरात दाखल होणार आहेत. सकाळ पासून गाड्या येण्यास सुरूवात होणार आहेत. या सर्व गाड्या दांडी आवार याठिकाणी ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती आगार प्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली.
सर्व गाड्यांतील चालकांना गाड्या सोडून कुठेही जावू नये असे निर्देश देण्यात आलेले आहेत. पोलीसांच्या सूचनेनुसार गाड्या पार्किंग मध्ये ठेवून त्याच ठिकाणी थांबून राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. प्रवासी वर्गाने ज्या गाडीतून आपण आलो त्या गाडीचा नंबर लक्षात ठेवून पुन्हा त्याच गाडीत येवून बसावे म्हणजे त्यांना पुन्हा त्यांच्या गावी जाताना कोणताही त्रास होणार नाही, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. एसटी प -शासनाकडून जास्तीत जास्त ग्रामस्थांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ४ डिसेंबर रोजी सकाळी गावातूनच गाडी सुटणार आहेत.








