कणकवली : तालुक्यातील वागदे -देऊळवाडी येथे आपले थकीत भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना शिवीगाळ व मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी दोघांवर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश घाडीगावकर व किशोर घाडीगावकर अशी संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद जखमी राजेंद्र प्रभाकर परब (४९, रा. वागदे- मांगरवाडी) यांनी दिली आहे.
याबाबत वृत्त असे की, राजेंद्र परब हे सेंट्रींग च्या कामासाठी भाडेतत्त्वावर प्लेट्स देण्याचा व्यवसाय करतात. राजेंद्र परब यांनी तीन वर्षांपूर्वी मंगेश घाडीगावकर यांना सेंट्रींग च्या कामासाठी प्लेट्स भाड्याने दिले होते. त्याचे पैसे त्याने अद्यापही न दिल्याने सोमवारी रात्री राजेंद्र परब व त्यांचा मुलगा शुभम परब हे दोघे घाडीगावकर यांच्या घरी पैसे मागण्यासाठी गेले. त्यावेळी मंगेश घाडीगावकर याने पैसे देणार नाही. तुला काय करायचे ते करून घे. असे सांगून शिवीगाळ केली. राजेंद्र परब यांचा मुलगा शुभम याने शिवीगाळ करू नका असे सांगितले.
त्यावेळी घाडीगावकर यांनी राजेंद्र परब यांना पाठीमागे पकडून हाताच्या थापटाने मारहाण केली. तसेच मंगेश घडीगावकर यांनी राजेंद्र परब यांच्या ओठाला जाऊन गंभीर दुखापत केली. त्यादरम्यान त्यांना अडवण्यासाठी अनंत गोसावी हे आले असता त्यांनाही किशोर घाडीगावकर यांनी लाकडी दांड्याने मारून दुखापत केली. राजेंद्र परब यांना रक्तस्राव होत असल्याने मुलगा शुभम हा त्यांना घेऊन जात असताना त्या घाडीगावकर बंधूंनी त्यांना येथे परत पैसे मागण्यासाठी यायचे नाही असे सांगितले.
राजेंद्र परब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी किशोर घाडीगांवकर व मंगेश घाडीगावकर विरोधात आयपीसी ३२५, ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ डिसेंम्बर रोजी रात्री घडली. जखमी राजेंद्र परब यांच्यावर गोवा बांबूळी येथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अधिक तपास एपीआय मनोज पाटील करत आहेत.








