27.62 टक्के खर्च
आगामी वर्षासाठी 300 कोटी आराखडा
फेब्रुवारी पूर्वी निधी खर्च करा, त्यात विलंब नको!
विद्यार्थी बस फेराणा प्राधान्यक्रम द्या.
बांदा क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी.
शिक्षक भरती बाबत तातडीने जाहिरात काढा
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश
सिंधुनगरी | प्रतिनिधी : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते तातडीने पूर्ण करण्यासाठी मंत्रालय पातळीवर पाठपुरवठा करून आठ दिवसात कार्यारंभ आदेश द्या. नव्या कोरोना व्हेरीएन्ट बाबत राज्याचे आरोग्य यंत्रणा सतर्क आहे, तसेच आरोग्य यंत्रणा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सतर्क ठेवाव तर लोकप्रतिनिधींचे काम निधी आणण्याचे असून सर्व अधिकाऱ्यांनी त्याची योग्य अंमलबजावणी करावी व निधी वेळेत खर्च करावा असे आदेश सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन सभेत दिले.
जिल्हा नियोजन समितीची सभा शुक्रवारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर,आमदार नितेश राणे,आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा नियोजन अधिकारी श्री भगवान पवार यांनी जिल्हा नियोजन कामकाजाची रूपरेषा स्पष्ट केली झालेल्या खर्चाचा आढावा दिला.
बांदा येथील क्रीडा संकुल विषय या सभेत मार्गी लागला. नमो योजनेअंतर्गत तीन कोटी रुपयांच्या खर्चातून हे क्रीडा संकुल साकारत आहे त्याला या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील शिक्षक भरती संदर्भात भरतीची तात्काळ जाहिरात काढा असे आदेशही शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. तर सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनस कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आवश्यक निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर करत हे विषय मार्गी लावले.
जिल्ह्यातील विकास कामांवर खर्च वेळेत खर्च करावा व शासनाकडून लोकांच्या सुविधेसाठी आलेला निधी तातडीने खर्च करावा यासाठी अधिकाऱ्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. लोकप्रतिनिधींचे काम पैसा आणणे हे असले तरी तो पैसा वेळेत खर्च होणे अपेक्षित असते. अधिकाऱ्यांनी त्या जाणिवेतून काम करावे असे आदेश वजा आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. मुख्यमंत्री सडक योजनेतील कामे मंजूर होऊ नये ती अडकून पडली आहेत. याबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून या कामांचे कार्यारंभ आदेश येत्या आठ दिवसाच्या आत निर्गमित करून त्या कामाना चालना द्यावी असे आदेशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी लक्ष वेधले होते.
सन 2027 पर्यंत राज्याचे उत्पन्न वन ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा असून त्यासाठी नियुक्त झालेल्या अभ्यास गटाने या जिल्ह्यातील उत्पन्न वाढीचे स्त्रोत जमा करावेत, आकडेवारी जमा करावी, हा सर्व अहवाल अथवा माहिती मराठी मधून तयार करावी व यामध्ये लोकप्रतिनिधीनाही सहभागी करून त्यांच्या सूचना घ्याव्यात, कृषी फलोत्पादन मत्स्य व्यवसाय आधी इंडस्ट्री मधील शेतकरी उत्पादक यांच्या समस्या जाणून घ्याव्या व या जिल्ह्यातील उत्पन्न वाढीसाठी चांगला प्रयत्न करावा असे आवाहनही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केले. तत्पूर्वी कोल्हापूर विद्यापीठाचे अर्थशास्त्र प्राध्यापक ज्ञानदेव तळुले यांनी या विषयातील अभ्यासपूर्ण माहिती सभागृहात दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नौसेना दिनाचा कार्यक्रम व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा यशस्वी झाला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद यंत्रणा या सर्व यंत्रणांनी काम केले त्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अभिनंदनचा ठराव घेत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. राज्य शासनाने याबद्दल 5:30 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास परवानगी दिली त्याबद्दल शासनाचे ही अभिनंदन करण्यात आले.
बॉक्स
27.62 टक्के खर्च
आगामी वर्षासाठी 300 कोटी आराखडा
यावर्षी मंजूर असलेल्या 200 कोटी निधीपैकी सद्यस्थितीत 139.70 कोटी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. 33.68 कोटी खर्च झाला आहे. म्हणजे 27.62 टक्केच खर्च झाला आहे. हा सर्व निधी वेळेत खर्च व्हावा म्हणजे फेब्रुवारी पूर्वी खर्च व्हावा यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व अधिकाऱ्यांना या सभेत आदेश दिले आहेत. तर आगामी वर्षासाठी म्हणजे सन 2024-25 वर्षासाठी 300 कोटीच्या जिल्हा वार्षिक आराखड्याला या सभागृहाचे मान्यता घेत शासनाकडे शिफारस केली आहे.
चिंदर तलाठी प्रकरण गाजले!
कुडाळ प्रांतांचा मनमानी कारभार उजेडात
चिंदर येथील तलाठ्यावर एका अर्थपूर्ण व्यवहारामुळे निलंबनाची कारवाई झाली, त्यानंतर त्याच सजावर फेर नियुक्ती देण्यात आली, याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला! कुडाळच्या उपविभागगीय अधिकारी,श्रीमती कळूसे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना न जुमानता तक्रारखोर तलाठी असलेल्या ‘त्या’ तलाठ्याला ‘तोच’ सजा देत मनमानी कारभार केल्याचे, पालकमंत्र्यांनी भर सभागृहात व्यक्त केलेल्या नाराजीनंतर उघड झाले! त्यामुळे चिंदरचा तो तलाठी अखेर प्रशासनाच्या पुन्हा हीट लिस्ट वर आला. त्यामुळे आता कुडाळच्या उप विभागीय अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
विद्यार्थ्यांच्या बस फेरी प्रश्न नितेश राणे आक्रमक
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात अनिमित बस फेऱ्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. किमान विद्यार्थ्यांच्या वेळात बसची कपात करू नये अशी विनंती आमदार नितेश राणे यांनी या सभागृहात केली. प्रत्येक डेपोला पाच ते सहा बसेसचा तुटवडा आहे. ज्या नव्या बसेस आल्या त्या फक्त सावंतवाडी डेपोला गेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बस डेपोंचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांचे भारमान किती आहे व आवश्यकता कुठे आहे याचे नियोजन करून विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम द्यावा अशा सूचनाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिल्या.











