बौद्धजन पंचायत समितीचे पालकमंत्र्यांना निवेदन
चिपळूण | प्रतिनिधी : आंबेडकरी अनुयायांची अस्मिता असणाऱ्या चिपळूण शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे, अशी मागणी चिपळूण तालुका बौध्दजन पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष संदेश मोहिते यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (बहादूरशेख नाका) परिसरात चिपळूण नगर पालिकेने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण दि. १४ एप्रिल २००७ रोजी पार पडले. आज या पुतळ्याला सतरा वर्षे झाली आहेत. मात्र या सतरा वर्षाच्या कालावधीत पुतळ्याच्या स्ट्रक्चरल ऑडिटसंदर्भात कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. तरी या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घालून पुतळ्याचे लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडीट होण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला सूचना करावी, अशी मागणीही संदेश मोहिते यांनी निवेदनाव्दारे केली आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत गुरूवारी चिपळूण दौऱ्यावर असताना त्यांनी हे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द केले. यावर आपण माहिती घेऊन पुढील कार्यवाहीसाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही ना. सामंत यांनी दिली. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण आदी उपस्थित होते.











