प्रश्नमंजुषा स्पर्धेत पोद्दार स्कूल कणकवली प्रथम

बेळगाव येथे झाली होती स्पर्धा, दहा शाळांमध्ये कणकवली पोद्दार स्कूलचे विद्यार्थी अव्वल

कणकवली : आजच्या तांत्रिक युगात विद्यार्थ्याने फक्त पुस्तकांच्या पानातच अडकून न राहता सभोवतालच्या जगाचा देखील आढावा घेऊन त्याबद्दल जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच आजूबाजूच्या घडामोडी म्हणजे सामान्य ज्ञान ,स्वतःच्या भाषेत कविता तयार करणे व मांडणे अशा गोष्टी खूपच महत्त्वाचे ठरतात.

यामध्ये नुकतेच पोदार इंटरनॅशनल स्कूल बेळगावी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या Knowledge Knock Out या थीमवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेत पोद्दार स्कूल कणकवली या शाळेचा तब्बल दहा विविध शाळांमधून प्रथम क्रमांक आला. यामध्ये ईशान नागवेकर , काव्या गावंढळकर , आर्य नवरे व मानसी बोभाटे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच रत्नागिरी स्कूल द्वारे आयोजित करण्यात आलेल्या स्वतः कवितांचे रचना व मांडणी या स्पर्धेत हिंदी व इंग्रजी विषयात पोदार इंटरनॅशनल स्कूल कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यात हिंदी विषयात गट- ब इयत्ता सहावी ते आठवी मधून अन्नपूर्णा चव्हाण इयत्ता आठवी ने प्रथम , गट-अ इयत्ता तिसरी ते पाचवी मधून आराध्या गुंडेवाडी इयत्ता पाचवी आणि द्वितीय सत्र गट -क इयत्ता नववी ते दहावी मधून अलीना खान हिने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच इंग्रजी विषयात गट – ब इयत्ता सहावी ते आठवी मधून देवश्री पाकळे इयत्ता आठवी हिने द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः कवितेची रचना व मांडणी करून ती सादर करावयाची होती. त्याचबरोबर इयत्ता सहावी व नववीच्या वर्गांसाठी घेण्यात येणाऱ्या होमी भाभा विज्ञान विषयाच्या परीक्षेत शाळेतील इयत्ता सहावीतील कुणाला गावंढळकर व वैश्रवण राणे तसेच इयत्ता नववीतील आर्य नवरे या विद्यार्थ्यांची पुढील लेव्हल साठी निवड करण्यात आली आहे.

शाळेचा प्राचार्या सौ. स्वाती कणसे यांनी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र, पदक व चषक देऊन त्यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.