सावंतवाडी । प्रतिनिधी : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज आंदोलन करत आहे. याला तळकोकणातून देखील पाठिंबा मिळत आहे. जरांगेंच्या मुंबई येथील आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १०० गाड्या जाणार असून मराठा बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते विकासभाई सावंत, सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, नवनिर्वाचित उद्योग शाखा जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, अभिषेक सावंत, संजय लाड, राजन म्हापसेकर, श्री. राणे आदी उपस्थित होते.
मराठा आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाला २०२१ ला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात मरगळ आली होती. त्यानंतर आता जरांगे- पाटील यांनी आंदोलन करत लढा उभारल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा पेटून उठला आहे. त्यांच्यामुळे मराठा समाज एकत्र आला आहे. महाराष्ट्रासह कोकण देखील त्यांच्यासोबत आहे. त्यांच्या आंदोलनात पनवेल येथे आम्ही सहभागी होणार आहोत. तर ‘मराठा जोडो’ अभियान आम्ही सुरू करत आहोत असही ते म्हणाले.
दरम्यान, मराठा आणि कुणबी यात फरक नाही. मराठा हाच कुणबी व कुणबी हाच मराठा आहे. गायकवाड आयोगाकडे आम्ही केलेल्या मागणीत मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण दिले जाव अशी मागणी केली होती.मराठा कुणबी व कुणबी मराठा या नोंदी आपल्या जिल्ह्यात देखील आहेत. याचे दाखले शासनाने लवकर द्यावेत. ही आकडेवारी शासनाने जाहीर करून चौदाशे पेक्षा जास्त नोंदी ज्या सापडल्यात त्यांना दाखले द्यावेत, अशी मागणीही केली.










