सावंतवाडी । प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये सातत्याने नाविन्याची भर पडावी तसेच या जगात वेगाने घडणाऱ्या बदलांसाठी सुसज्ज होत असताना लागणाऱ्या अद्ययावतेतच्या दृष्टीने सतत कार्यरत आणि प्रयत्नशील असणाऱ्या भोंसले नॉलेज सिटी येथील यशवंतराव भोंसले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने सलग पाचव्या वर्षीही राष्ट्रीय स्तरावरती एक दिवशीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर संमेलन दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी “वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्रातील विज्ञान” या विषयाला अनुसरून भोंसले नॉलेज सिटी येथील यशवंतराव भोंसले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होईल.
भारतीय औषध कंपन्यांतर्फे गेल्या काही वर्षात नवीन औषधांच्या निर्मितीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. भारतातील पारंपारिक औषधांना वैज्ञानिक बैठक देऊन त्याद्वारे नवनवीन औषधांची निर्मिती करणे हे आव्हान या क्षेत्रासमोर आहे. तसेच या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र यांचा आखीव समन्वय साधणेही अत्यावश्यक आहे. ही दोन प्रमुख उद्दिष्टे दृष्टीक्षेपात ठेऊन ह्या संमेलानाद्वारे औषधसंशोधनक्षेत्रातील अद्ययावत घडामोडींसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण व औद्योगिक क्षेत्रातील अनुभवी तज्ञ मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
सदर संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रकाश गुरव (अधिष्ठाता (डीन), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ओरस, सिंधुदुर्ग) उपस्थित राहणार आहेत. तसेच विषय तज्ञ म्हणून डॉ. क्रिष्णा अय्यर (प्राचार्य, बॉम्बेकॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई) आणि डॉ. शैलेंद्र गुरव (विभागप्रमुख, गोवा कॉलेज ऑफ फार्मसी, गोवा) प्रारंभीच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांसोबत चर्चा करतील.
विविध विचारसरणींना एकाच छताखाली आणणे आणि समोरासमोर विचारांची देवाणघेवाण करणे, संशोधन संबंध प्रस्थापित करणे आणि भविष्यातील सहकार्यासाठी भागीदार शोधण्याची संधी उपलब्ध करून देणे हे या संमेलनाचे उद्दीष्ट ठेवून भोजनानंतरच्या सत्रामध्ये भित्तीत्रक प्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयामार्फत करण्यात आले आहे. या संमेलनासाठी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात इ. राज्यातून सुमारे ७०० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सहभाग अपेक्षित आहे.
सदर कार्यक्रमाची आखणी महाविद्यलायाचे प्राचार्य डॉ. विजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली केली गेली असून, कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. तुषार रुकारी, डॉ. रोहन बारसे, डॉ. प्रशांत माळी, प्रा. विनोद मुळे, प्रा. रश्मी महाबळ, पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य सत्यजित साठे तसेच पदविका विभागाचे विभागप्रमुख श्री. ओंकार पेंडसे यांच्या मदतीने नियोजन करत आहेत.
सातत्यपूर्ण सलग पाचव्या वर्षी अश्या प्रकारच्या औषधनिर्माण शास्त्रातील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केल्यामुळे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. अच्युत सावंत-भोंसले यांनी कौतुक केले असून संस्थेच्या अध्यक्षा ॲड. अस्मिता सावंत-भोंसले, सचिव संजीव देसाई तसेच प्रशासकीय समन्वयक श्रीमती सुनेत्रा फाटक यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.