मुंबई : ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील घरी सक्तवसुली संचलनालयाने मंगळवारी सकाळी (ईडी) धाड टाकली आहे. ईडीच्या या पथकात १० ते १२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साधारण साडेआठच्या सुमारास ईडीचे पथक वायकर यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर वायकर यांच्या घरी ईडीची झाडाझडती सुरु आहे. वायकरांशी संबंधित सात ठिकाण्यांवर ईडीची छापेमारी सुरु असून यामध्ये त्यांच्या भागिदारांच्या घरांचाही समावेश आहे. रवींद्र वायकर हे रत्नागिरीचे पालकमंत्री होते.
यानिमित्ताने ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या कचाट्यात सापडला आहे. यापूर्वी संजय राऊत, अनिल परब या ठाकरे गटातील नेत्यांच्या घरी ईडीच्या धाडी पडल्या होत्या. यापैकी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती आणि त्यांना तब्बल तीन महिने तुरुंगात राहावे लागले होते. त्यानंतर रवींद्र वायकर यांचे नाव सातत्याने चर्चेत होते. रवींद्र वायकर यांची यापूर्वी ईडी चौकशी झाली होती.











