राजापूर | वार्ताहर : थंडीचा मोसम सुरू असताना सोमवारी रात्री तालुक्यात हलका पावसाच्या सरी पडल्याने व मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण पसरल्याने त्याचा आंबा काजूवर प्रतिकुल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आंबा काजू बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
कोकणचे आर्थिक कणा असलेली आंबा आणि काजू गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात आली आहेत. दरवर्षी अवेळी पडणाऱ्या पावसामुळे या दोन्ही पिकाच्या उत्पनावर त्याचा प्रतिकुल परिणाम होत आहे.
सध्या हिवाळी सुरू असून थंडी पडत असल्याने आंबा आणि काजूला मोहोर येवून काही भागात चांगली फळधारणाही झालेली आहे. आलेला मोहोर टिकावा व फळधारणा व्हावी म्हणून शेतकरी, बागायतदार विविध औषधांची फवारणी करतो. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे.
ऐन थंडीच्या हंगामात पावसाच्या सरी कोसळल्याने मोहोर गळून पडण्याची व विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. सोमवारी रात्री तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या तर दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. पाऊस आणि ढगाळ वातावरण या दोन्ही गोष्टी आंबा आणि काजूला घातक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.









